कोल्हापूर मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांत असंतोष; रिक्त पदे भरा; अन्यथा सामुदायिक राजीनामे देण्याचा इशारा

विकासकामांतील निकृष्टपणा, दररोजचे आरोप-प्रत्यारोप आणि लोकप्रतिनिधींकडून सुद्धा सतत धारेवर धरण्यात येत असल्याने, अखेर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे समोर आले आहे. अतिरिक्त पदभार कमी करा आणि रिक्त पदे तातडीने भरा अन्यथा सामुदायिक राजीनामा देऊ, असा थेट इशाराच मनपा अभियंत्यांनी दिला आहे. यासंदर्भात महापालिका कर्मचारी संघाकडून आयुक्त तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आले.

महानगरपालिकेत सध्या अभियंता वर्गातील 167 पैकी 130 पदे रिक्त आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, प्रकल्प व वाहतूक 31, नगररचना 16, शहर पाणीपुरवठा व ड्रेनेजमधील 10 पदे रिक्त आहेत. शिवाय सहायक, भूमापक, आरेखक अशी 62 पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांची संख्या मोठी असल्याने, सध्या कार्यरत अभियंत्यावर नियुक्ती असलेल्या विभागासह अन्य विभागांचा अतिरिक्त कारभाराचा भार आहे. याचा कामकाजावर परिणाम होत असल्याने, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या बांधकाम, नगररचना, पाणीपुरवठा, ड्रेनेज अशा विभागामध्ये अभियंत्यांची संख्या निम्म्यांहून अधिक रिक्त आहे. तसेच अभियांत्रिकी सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांना निवडणूक कामकाज, अतिक्रमण काढणे, जनगणना, सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण अशी अतिरिक्त कामेदेखील करावी लागत आहेत. अतिरिक्त कामामुळे शारीरिक व मानसिक त्रास होत आहे.

मागील सहा महिन्यांत अभियांत्रिकी सेवेतील दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कारवाई करताना संबंधित अभियंत्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधीदेखील दिलेली गेली नाही. चौकशी अधिकाऱ्यांकडून अहवाल प्रशासनाकडे सादर होण्यापूर्वीच निलंबनामुळे भविष्यात अतिरिक्त कामामुळे आपल्या हातून काही त्रुटी राहून अनुचित प्रकार घडेल, अशी भीती निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी मनपा कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे, मुख्य संघटक संजय भोसले, विजय चरापले, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, सुरेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

एकतर्फी कारवाई नको…

महापालिका फायरब्रिगेड इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला. त्यानंतर पालकमंत्री तसेच नियोजन मंडळाचे कार्य. अध्यक्ष यांनी घेतलेल्या बैठकीत महानगरपालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रस्त्यांचा दर्जा आणि खड्डय़ांवरूनही ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर मनपा प्रशासनाकडून संबंधित उप-अभियंत्यावर कारवाई करून, शहर अभियंत्यांसह अन्य अधिकाऱ्यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांचे म्हणणे ऐकून न घेता प्रशासनाकडून करण्यात आलेल्या एकतर्फी कारवाईचा मनपा कर्मचारी संघाकडून यावेळी निषेध करण्यात आला. तसेच यापुढे अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.