
हिंदुस्थानच्या नियंत्रण रेषेवर (एलओसी) जवळपास 104 ते 135 दहशतवादी दबा धरून बसले असून ते कश्मीरात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. सीमा सुरक्षा बलचे (बीएसएफ) महानिरीक्षक राजा बाबू सिंह यांनी सोमवारी ही माहिती दिली. या दहशतवाद्यांची घुसखोरी उधळून लावण्यासाठी बीएसएफ ऍलर्ट मोडवर आहे.
मागील वर्षी हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करार झाला आहे. या करारानंतर एलओसीवर शांतता आहे. मात्र गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या नव्या इशाऱ्यानुसार, जवळपास 104 ते 135 दहशतवादी कश्मीरात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ते सध्या पाकिस्तानी सैन्याने तयार केलेल्या लॉन्च पॅडवर दबा धरून बसले आहेत. बीएसएफकडून त्या दहशतवाद्यांच्या हालचाली व इतर कारवायांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे, असे महानिरीक्षक सिंह यांनी सोमवारी बीएसएफ मुख्यालयातील वार्षिक संमेलनात बोलताना सांगितले.




























































