कोरोनानंतर सातारकरांवर स्वाइन फ्लूचे संकट, आठवड्याभरात 14 पॉझिटिव्ह रुग्ण

कोरोनाचे संकट संपत नाही तोवर सातारकरांच्या उरावर स्वाइन फ्लूचे भूत बसले आहे. गेल्या आठवडय़ाभरात तब्बल 14 स्वाइनचे रुग्ण आढळले आहेत. तर बुधवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

स्वाइनचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत 17 रुग्ण आढळले असून, कराड व सातारा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेत हजारो लोकांचा बळी गेला. अद्यापही कोरोनाचे संशयित आढळतच आहेत. असे असताना आता स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. गेल्या आठवडाभरापासून स्वाइनचे संशयित आढळण्यास सुरुवात झाली होती. आता स्वाइनच्या रुग्णांचा आकडा 17 वर गेला आहे. त्यामुळे सातारकरांना धास्ती लागून राहिली आहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर प्रारंभी तीन रुग्ण आढळले होते. याची खातरजमाही पुण्याच्या लॅबमध्ये नमुने तपासून करण्यात आली होती. यानंतर अवघ्या आठवडय़ातच त्यात 14 जणांची भर पडली आहे. बुधवारी एकाच दिवसात तीन रुग्णांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

कोरोनात हॉटस्पॉट ठरलेल्या कराड आणि साताऱयात स्वाइन फ्लू रुग्णांचीही संख्या वाढू लागली आहे. बहुतांश रुग्ण हे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आजपर्यंत जावली तालुक्यात 2, कराड 4, खटाव 3, महाबळेश्वर 1, पाटण 1, सातारा 3, वाई 1 व इतर 2 असे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 10 पुरुष व 7 महिलांचा समावेश आहे. तर, खटावमधील दोन व पाटण तालुक्यातील एकाचा स्वाइनने मृत्यू झाला आहे. स्वाइनचे रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना काळजी घेण्याचे व वेळेवर तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी आरोग्य केंद्र व रुग्णालयात यंत्रणा सज्ज झाली आहे.

अंगावर आजार काढू नका – डॉ. पवार

आजारी असणाऱया रुग्णांनी गर्दीमध्ये जाणे टाळावे, शिंकताना, खोकताना रुमाल वापरावा. हात स्वच्छ धुवावेत. प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्यावा. ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करावी. कोणताही आजार सौम्य आहे असे न पाहाता डॉक्टरांकडे जावे. नागरिकांनी अंगावर आजार काढू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी केले आहे.