
ड्रग्ज लिंकप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने गेल्या दोन दिवसांत 15 तास चौकशी केली. चौकशी केल्यानंतर आज दुपारी कासकरला पोलीस बंदोबस्तात ठाणे जेलमध्ये नेण्यात आले. गरज वाटल्यास ‘एनसीबी’ कासकरची पुन्हा चौकशी करणार आहे.
‘एनसीबी’ने भिवंडीच्या अर्जुन टोल प्लाझा येथे कारवाई करून शबीर शेख आणि अहमद ताझाच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्या दोघांच्या चौकशीत इक्बाल कासकरचे नाव समोर आले होते. ड्रग्ज लिंक समोर आल्याने त्याची चौकशी ‘एनसीबी’ने सुरू केली. चौकशीसाठी ‘एनसीबी’ने पत्रव्यवहार करून शुक्रवारी सकाळी इक्बालला ठाणे जेलमधून ताब्यात घेतले. दुपारी पावणेतीनच्या सुमारास इक्बालला पोलीस बंदोबस्तात ‘एनसीबी’च्या कार्यालयात आणले. ‘एनसीबी’ने इक्बालची शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस मिळून तब्ब्ल 15 तास चौकशी केली. चौकशीदरम्यान ‘एनसीबी’ला इक्बाल आणि शबीरची महत्त्वपूर्व माहिती मिळाली आहे. 2007 मध्ये इक्बाल आणि शबीर भेटले होते. त्यानंतर ते दोघे एकमेकाच्या संपर्कात असल्याचे ‘एनसीबी’च्या सूत्रांनी सांगितले. आज सकाळी चौकशी पूर्ण झाल्यावर ‘एनसीबी’च्या अधिकाऱयांनी इक्बालला न्यायालयात सादर केले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात त्याला ठाणे जेलला नेण्यात आले.



























































