मुंबईतील धूळमुक्तीवर पाण्याचा उतारा, तीन दिवसांत 154 किमी रस्त्यांवर पाण्याचा मारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील धूळ आणि धुरक्यामुळे वाढलेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील रस्ते पाण्याने धुवायला सुरुवात केली आहे. 3 ते 5 नोव्हेंबर या तीन दिवसांत 154 किमी लांब रस्त्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला. जेट मशीन, फायर एक्स व अन्य यंत्रणेचा वापर करून दरदिवशी सरासरी 55 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात येत आहेत. दरम्यान, ज्या विभागात हवेची गुणवत्ता खालावलेली आहे अशा ठिकाणी मिस्टिंग मशीनद्वारे पाण्याची फवारणी करण्यात येत आहे, तर धुळीचे प्रमाण अत्याधिक असलेल्या रस्त्यांवर ब्रशिंग करून नंतर जेट मशीनद्वारे पाणी फवारण्यात येत आहे.

मुंबईतल्या हवेच्या प्रदूषणाने दिल्लीतील विषारी प्रदूषणासारखी पातळी गाठल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढल्यामुळे मुंबई महापालिकेने तातडीने कारवाई करायला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये 60 फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करून ते पाण्याने धुऊन काढण्यात येत आहेत. एकूण 357 रस्ते व 676 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा त्यात समावेश आहे. याकरिता दररोज 121 टँकरद्वारे रस्त्यांवर पाण्याची फवारणी केली जात आहे. महापालिकेच्या स्लज डिवॉटरिंग (17), फायरेक्स टँकर (7), सूक्ष्मजल फवारणी यंत्र (5) मिस्ट ब्लोविग यांचादेखील वापर केला जात आहे. या कार्यवाहीसाठी विविध पुनर्वापर प्रक्रियेद्वारे उपलब्ध तसेच स्थानिक जलस्रोत जसे की तलाव, विहिरी, कूपनलिका यामधून उपलब्ध पाण्याचा वापर करण्यात येत आहे.

– हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधार करण्यासाठी धूळ नियंत्रण प्रणाली व हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
– प्रिंकल तसेच 30 स्मोक गनचा वापर करण्यात येणार आहे.
– बांधकामादरम्यान हवा गुणवत्ता नियंत्रण यंत्रे, 30 फूट उंचीपर्यंत पत्रे लावणे, बांधकाम व पाडकामाचा राडारोडा ने-आण करताना आवश्यक काळजी घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
– वायू प्रदूषण अधिनियम 1981 नुसार बांधकामांवरील आस्थापनांना पूर्वसूचना देऊन सुधारणा करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

दररोज सरासरी 55 किमीचे रस्ते होत आहेत स्वच्छ

– मुंबई महापालिकेने गेल्या तीन दिवसांपासून कठोर कारवाई करायला सुरुवात केली असून राडारोडा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 4 लाख 71 हजार दंड वसुली केली आहे. या पुढील काळातही दंडात्मक कार्यवाही सुरू राहणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.