चंद्रपूरमध्ये आढळले कोरोनाचे 16 रुग्ण, नियमांचे कडक पालन होणार

761

चंद्रपूर जिल्ह्यात संपर्कातून बाधितांची संख्या वाढत आहे. कमीत कमी नागरिकांच्या संख्येमध्ये लग्न समारंभ व सामुदायिक कार्यक्रम करणे गरजेचे आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक असणार आहे. नागरिकांनी माहिती लपविल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्या जाईल असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. जिल्ह्यात आज बाधितांची संख्या 16 ने वाढल्यामुळे एकूण संक्रमित संख्या 150 झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ब्रम्हपुरी व भद्रावती येथील प्रत्येकी 5,जानाळा-बेंबाळा 3 व गडचांदूर येथील 3 बाधितांचा आजच्या 16 रुग्णांमध्ये समावेश आहे.

जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तू विक्री व वितरण आणि जीवनावश्यक व्यतिरिक्त वस्तू, विक्री व वितरण इत्यादी सर्व प्रकारचे आस्थापने दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहतील. परंतु, सदर आस्थापनांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच निवासाची व्यवस्था असलेले लॉज, हॉटेल, खाजगी विश्रामगृह सुद्धा सुरू झालेले आहेत. यापुर्वी दुकानांना 5 वाजेपर्यंतच परवानगी होती.

जिल्ह्यामध्ये गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी आरोग्य विभागाकडून आलेल्या प्राथमिक माहितीनुसार एकाच दिवशी 16 बाधित पुढे आले आहेत. कालपर्यंत जिल्ह्यामध्ये 134 पॉझिटीव्ह आढळले होते. आज त्यामध्ये 16 बाधिताची भर पडल्याने एकूण संख्या 150 झाली आहे. आतापर्यंत 80 नागरिक कोरोना मुक्त झाले असून सध्या 70 नागरिक जिल्हयात उपचार घेत आहेत. 150 संख्येमध्ये चंद्रपूर शहरात निदान झालेले अन्य जिल्ह्यातील 4 बाधित आहेत. हे चारही बाधित राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत.

ब्रम्हपुरी येथील बाधितांची संख्या रोज वाढत आहे. गुरुवारी ब्रह्मपुरी शहरातील भवानी वार्ड येथील एक, तालुक्यातील खेड, बेटाळा, सौंद्री, मुडझा या चार गावातील प्रत्येकी एका पॉझिटिव्हचा समावेश आहे. तालुक्यातील आजची पॉझिटीव्ह संख्या पाच झाली आहे.

तर मूल तालुक्यातील बेंबाळ येथील हैदराबाद येथून आलेला नागरिक पॉझिटिव्ह ठरला आहे. मुल तालुक्यातीलच जानाळा येथूनही संपर्कातून पॉझिटिव्ह झालेल्या दोन नागरिकांचा समावेश आहे. भद्रावती शहरातील पॉझिटिव्ह बाधितांच्या संपर्कातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली असून शहरात सतत संख्या वाढत आहे.गडचांदूर येथे देखील संपर्कातील 3 पॉझिटिव्ह पुढे आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या