
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यभरात काढलेले 58 मोर्चे, जेल भरो आंदोलने आणि 42 मराठा बांधवांनी दिलेल्या बलिदानानंतर मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांच्या लढय़ाला अखेर यश आले आहे. या समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण देणारे विधेयक आज विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. राज्य सरकारने हे ऐतिहासिक पाऊल उचलल्यानंतर सर्वत्र जल्लोष आणि आनंदोत्सव सुरू झाला आहे. सरकारवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मराठय़ांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास ठरविणारा अहवाल व आरक्षण देणारे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहांसमोर त्यावेळी मांडले. भगवे फेटे परिधान करून आलेल्या शिवसेना-भाजपच्या आमदारांनी दिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांच्या जयघोषात स्वागत केले. सत्ताधारी व विरोधकांनी या ऐतिहासिक विधेयकावर एकमताची मोहर उमटवली. अन्य प्रवर्गांच्या 52 टक्के आरक्षणाला धक्का न लावता एसईबीसी हा स्वतंत्र प्रवर्ग करीत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱयांमध्ये 16 टक्के आरक्षण देणारे विधेयक संमत झाले.
मराठा आरक्षण कृती अहवाल आणि विधेयक आजच आणण्याची रणनीती ठरविण्यात आली होती. कार्यक्रम पत्रिकेत अहवाल पटलावर ठेवण्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र विधेयकाचा उल्लेख नसल्याने कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘विधेयक कधी आणणार?’ अशी विचारणा केली. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास मराठा समाजाचा कृती अहवाल सादर केला. या अहवालात मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशी ठेवण्यात आल्या.
त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी विधेयक आजच आणणार असल्याचे सांगितले. विरोधकांना कृती अहवाल आणि विधेयकाची प्रत दिल्यानंतर त्यांनी मागितलेल्या वेळेनुसार अर्धा तास सभागृह तहकूब करण्यात आले. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले.
चर्चेशिवाय विधेयक मंजूर, विरोधकांचे आभार
विधेयकावर कोणतीही चर्चा न करता ते मंजुरीसाठी ठेवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी विधेयक मांडल्यानंतर त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आवाजी मतदान घेत विधेयक एकमताने मंजूर झाल्याचे जाहीर केले. सर्वपक्षीय सदस्यांनी बाके वाजवत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा एकच जयघोष केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, रासप, एमआयएम, आरपीआय, अपक्ष या सर्व विरोधी पक्षनेत्यांचे आभार मानले.
52 टक्के आरक्षणास कोणताही धक्का नाही
मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांचा ओबीसी प्रवर्गात तर समावेश होणार नाही ना अशी भीती वर्तविण्यात येत होती, मात्र विधेयकात ती भीती स्पष्टपणे साधार खोडून काढण्यात आली आहे. मागासवर्गीय समाजाच्या सुस्थापित आरक्षणाविषयी हकदारीमध्ये 30 टक्के मराठा नागरिकांसाठी हिस्सा देण्यास सांगितले तर निश्चितच एक असामान्य परिस्थिती निर्माण होण्याचे घोर संकट उभे राहील. त्यावर जलद आणि न्यायरितीने तोडगा काढला नाही तर राज्याच्या सध्याच्या सुसंवादी अशा सांस्कृतिक जीवनावर त्याचे दूरगामी परिणाम होतील हे लक्षात घेऊन राज्यात सध्या लागू असलेल्या विद्यमान 52 टक्के आरक्षणास धक्का न लावता त्यात वाढ करण्यासाठी व जे उन्नत व प्रगत गटातील नाहीत केवळ अशाच व्यक्तींना 50 टक्क्यांची कमाल मर्यादा वाढवून आरक्षणाच्या टक्केवारीची तरतूद करणे योग्य आहे असे या विधेयकात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात 30 टक्के मराठा
मराठा समाजाची राज्यातील लोकसंख्या सुमारे 30 टक्के इतकी असून शासकीय नोकरीतील मंजूर पदांच्या तुलनेत ‘अ’ गटात 18.95, ‘ब’ गटात 15.22, ‘क’ गटात 19.56 आणि ‘ड’ गटात 18.23 असे टक्केवारीचे प्रमाण आहे. त्याचबरोबर भारतीय प्रशासन सेवेतील प्रमाण 6.92 इतके असून थेट निवड भरतीद्वारे हे प्रमाण 0.27 टक्के आहे. तसेच भारतीय पोलीस सेवेतील प्रमाण 15.92 टक्के आहे तर भारतीय कन सेकेतील प्रमाण 7.87 टक्के असल्याचे समोर आले आहे.
मागासवर्ग आयोग काय म्हणतो?
मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. मराठा समाज या तिन्ही निकषांची पूर्तता करीत असल्याने हादेखील कुणबी समाजाप्रमाणे मागास असल्याने मराठा समाजाचादेखील मागास प्रवर्गात समावेश केला जावा असे आयोगाने म्हटले आहे.
शैक्षणिक दर्जा
मराठा समाजामध्ये अशिक्षित 13.42 टक्के, प्राथमिक शिक्षण 35.31 टक्के, एसएससीपर्यंत 43.79 टक्के आणि एचएससी व पदवीपेक्षा कमी आणि पदव्युत्तर 6.71 आणि तांत्रिक व व्यावसायिकदृष्ट्या सक्षम 0.77 टक्के आहे. प्राथमिक शिक्षणातील गळतीचे प्रमाण 7.56 टक्के असून ते कुणबी व इतर मागासवर्गापेक्षा जास्त आहे.
सामाजिक दर्जा
मराठा समाजातील 76.86 टक्के नागरिक हे शेती व शेतमजुरीवर अवलंबून आहेत. मराठा समाज नागरी विभागामध्ये स्थलांतरित झाला आहे. हा समाज माथाडी, हमाल, घरगुती काम, डबेवाला, गोदी कामगार यासारख्या शारीरिक कष्टाचे काम करीत आहे. त्याचे प्रमाण 53 टक्के आहे. राज्यातील 70 टक्के मराठा समाज कच्च्या घरात राहत आहे, तर 58 टक्के घरांमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर नाही. या समाजात आत्महत्येचे प्रमाणही चिंताजनक असून सर्वेक्षणातील 40 हजार 962 कुटुंबांतील 340 सदस्यांनी आत्महत्या केली, तर सन 2013 ते 2018 या कालावधीत 13 हजार 368 शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आर्थिक दर्जा
मराठा समाजामध्ये पिवळी शिधापत्रिकाधारक व केशरी शिधापत्रिकाधारकांचे प्रमाण एकूण 93 टक्के आहे. मराठा समाजाच्या एकूण लोकसंख्येपैकी 72.82 टक्के कुटुंबाचे उत्पन्न 50 हजारांपेक्षा कमी आहे, तर 37.28 टक्के लोक दारिद्रय़रेषेखाली राहत आहेत. 49 टक्के मराठा कुटुंबाकडे कोणतेही वाहन नाही.
आयोगाच्या शिफारशी
नागरिकांच्या मराठा वर्गास, सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागासवर्ग अर्थात (एसईबीसी) म्हणून घोषित करण्यात येत आहे.
मराठा वर्ग भारतीय संविधानाचा अनुच्छेद 15 (4) क 16 (4) मध्ये समाकिष्ट केलेले आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हकदार आहे. मराठा वर्गास सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागासवर्ग म्हणून घोषित केल्याने असामान्य व असाधारण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचे निवारण करण्यासाठी घटनात्मक तरतुदींमध्ये उचित निर्णय घेता येईल.
आरक्षणाचे वाटप
मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टय़ा मागासलेला आहे. लोकसंख्येच्या जवळपास 30 टक्के असणाऱ्या मराठा समाजास मागास दर्जा दिल्यानंतर जवळपास 85 टक्के जनता मागास म्हणून गणली जाणार आहे व त्यांना आरक्षणाचे फायदे द्यावे लागणार आहेत.
2014 साली नोकरी मिळालेल्या मराठा तरुणांना नोकरीत कायम करा, शिवसेनेची मागणी
मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याबाबत विधेयक आणून ते एकमताने मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना, या समाजातील ज्या तरुणांना 2014 साली सरकारी नोकरी मिळाली त्यांना नोकरीत कायम करा, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पास झाले, पण त्यांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत त्यांना तत्काळ सेवेत सामावून घ्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. प्रभू यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.
आरक्षण टिकेल अशीच विधेयकात तरतूद
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी तसेच अन्य समाजाच्या आरक्षणाला संरक्षण दिलेले आहे. तसे कलमच या कायद्यात टाकलेले आहे. देशाच्या संविधानाने आरक्षण देण्याकरिता जे निकष ठरवलेत त्यानुसारच मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेले आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकेल अशी तरतूद या विधेयकात केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर झाल्यानंतर पत्रकारांशी मुख्यमंत्री बोलत होते. कायदा करताना ओबीसींनाही संरक्षण देण्यात आले आहे. 52 टक्क्यांपुढे जाऊन आरक्षण देण्यात आले आहे. मागच्या वेळेस आरक्षण दिल्यानंतर न्यायालयाने काही मुद्दे उपस्थित केले. उच्च न्यायालयाने ज्या कमतरतांवर बोट ठेवले होते त्या कमतरता हा कायदा करताना पूर्ण केल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षण टिकावे यासाठी या अहवालात कायदेशीर तरतूद केली आहे. संविधानाने जे निकष ठरवलेत त्यानुसारच हे आरक्षण देण्यात आलेले आहे, असे स्पष्ट करतानाच दोन समाजांमध्ये शंका पसरवून तेढ निर्माण केली जात आहे हे अत्यंत चुकीचे आहे, अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
46 गुन्हे मागे घेणार नाही
आरक्षणासाठी आंदोलन पुकारणाऱ्या मराठा समाजावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजावरील गुन्हे मागे घेण्याचा शासकीय निर्णय यापूर्वीच काढला आहे. मराठा आंदोलकांवरील 200 गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. 300 गुन्हे मागे घेण्याबाबत समिती विचार करतेय. असे एकूण 500 गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. उर्वरित 46 गुन्हे असे आहेत की ज्यांचे फुटेज उपलब्ध आहेत. हे गुन्हे मागे घेता येणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आरक्षण भविष्यात टिकले पाहिजे शहीद काकासाहेब शिंदे यांच्या वडिलांची अपेक्षा
सरकारने मराठा समाजाला दिलेले 16 टक्के आरक्षण हे भविष्यातही टिकले पाहिजे. आरक्षण जर आधीच दिले असते तर आमचा काकासाहेब व इतर मराठा बांधवांना बलिदान द्यावे लागले नसते, अशी भावना शहीद काकासाहेब शिंदे यांचे वडील दत्तात्रय शिंदे यांनी सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर दिली.
























































