राज्यातील वीज ग्राहकांना 16 टक्के दरवाढीचा शॉक, अदानींसाठी अट्टाहास; काँग्रेसचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा मोठा शॉक बसणार आहे. महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे 20 ते 40 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. यासंदर्भात नागपूरमध्ये जनसुनावणी झाली आहे. ही वीज दरवाढ अदानींच्या फायद्यासाठी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज केला.

या वीज दरवाढीमुळे  राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहक,  छोटे, मध्यम, लघू उद्योजकांचे कंबरडे मोडणार आहे. शेजारच्या गुजरात, कर्नाटक, तेलंगणा राज्यांत महाराष्ट्रापेक्षा विजेचे दर कमी आहेत. गुजरामध्ये घरगुती वीज दर 3 ते 5.2 रुपये प्रतियुनिट, कर्नाटकात 3.7 ते 7.3 रुपये प्रतियुनिट, तेलंगणात 2 ते 10 रुपये प्रतियुनिट दर असताना महाराष्ट्रात तेच दर 4.4 ते 12.8 रुपये प्रतियुनिट आहेत. वीज निर्मितीसाठी लागणारा खर्च सर्व राज्यांत सारखा असताना महाराष्ट्रातच वीज महाग का, असा सवाल लोंढे यांनी केला.

वीज महाग असल्यामुळे नवीन उद्योग राज्यात येण्यास तयार नाहीत. अनेक उद्योगही इतर राज्यांत स्थलांतराच्या विचारात आहेत. राज्य वीज नियामक आयोगाच्या नव्या सुधारित आदेशामुळे विद्यमान वीज दरात 20% ते 40% पर्यंत वाढ झाली आहे. लघु आणि  मध्यम उद्योग जे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत त्यांच्यावर याचा थेट परिणाम होऊन संपूर्ण यंत्रणाच कोसळू शकते, अशी भीती त्यांनी या वेळी व्यक्त केली.

राज्यातील वीज ग्राहकांना स्वस्त वीज देण्याचे आश्वासन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असताना महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे 20 ते 40 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे.

अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते