
कोरोनामुळे मृत झालेल्या प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 50 हजारांची मदत केली जाणार आहे. या मदतीसाठी कोविडमुळे मृत्यू झालेल्या पाच हजार मृतांच्या नातेवाईकांनी आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेकडे पात्रतेसाठी अर्ज केले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. दरम्यान, मुंबईत कोरोनामुळे 18 डिसेंबरपर्यंत 16 हजार 363 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे अर्ज करावे लागणार आहेत. या अर्जांची छाननी करून पात्र अर्ज राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत. मुंबईत मदत मिळण्यासाठी पालिकेने मंजूर केलेल्या अर्जदारांच्या कुटुंबीयांनाच राज्य सरकारच्या माध्यमातून थेट बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याने कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांनाच ही मदत केली जाणार आहे. त्यामुळे पालिकेकडे ऑनलाइन अर्ज सादर केले जात आहेत. कोरोनामुळे प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक गणित बिघडले आहे, तर काही ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन-तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ‘आधार’ देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक मदतीसाठी वेगवेगळा अर्ज
कोरोनामुळे अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मृताचे कुटुंबीय-अर्जदाराला राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रत्येक मदतीसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.
अर्जासाठी हे आवश्यक
z मृत व्यक्तीचे आधार कार्ड, z अर्जदाराचे आधार कार्ड, z मृत्यूचा दाखला, z ‘आरटी-पीसीआर’ रिपोर्ट, z क्रिमिनेशन सर्टिफिकेट, z बँक खाते क्रमांक, डिटेल्स

























































