फेसबुकवर पित्यानेच केला अल्पवयीन मुलीचा लिलाव, 8 बायकांच्या दादल्याने घेतलं विकत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। सुदान

दक्षिण सुदानमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. येथे एका पित्याने आपल्या 17 वर्षीय मुलीचा चक्क फेसबुकवरच लिलाव केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलीला एका आठ बायकांचा पती असलेल्या 60 वर्षीय व्यावसायिकाने नववी पत्नी म्हणून विकत घेतले. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच मानवाधिकार संघटना मुलीला सोडवण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. तसेच मुलीच्या लिलावाची पोस्ट न हटवल्याने नेटकऱ्यांनी फेसबुकवरही टीका केली आहे.

या व्यावसायिकाने मुलीच्या मोबदल्यात तिच्या वडीलांना 500 गायी, दोन आलिशान कार, दोन मोटारसायकल, एक बोट, महागडा मोबाईल फोन आणि 10, 000 डॉलर दिले. आफ्रीकेत महिलांसाठी काम करणाऱ्या एका संघटनेने याबद्दल ट्वीट केले होते. यात फेसबुकवर मुलीच्या लिलावाची पोस्ट बघून पाच व्यक्तींनी तिच्या वडिलांशी संपर्क साधला. यात लष्कराच्या एका उच्च अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. दरम्यान मानवधिकार संघटना व महिला संघटनांनी त्या व्यावसायिकाच्या तावडीतून मुलीची सुटका करण्याचे सर्व प्रयत्न केले पण त्यांना अपयश आल्याचे अफ्रीकन फेमिनिज्म या संघटनेने म्हटले आहे. यासाठी फेसबुकच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.