
कोरोनाचे वाढलेले रुग्ण, मृत्यूची संख्या यामुळे देशातील किमान 170 जिल्हे कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित केले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिली. दरम्यान, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11555 वर गेली असून, आतापर्यंत 396 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी तीन भागात देशांतील जिह्यांचे विभाजन केले जाणार आहे. हॉटस्पॉट असलेले जिल्हे रेड झोनमध्ये, रुग्णांची संख्या कमी असलेले येलो झोनमध्ये तर, कोरोनाचा प्रार्दूभाव न झालेले जिल्हे ग्रीन झोनमध्ये टाकण्यात येणार आहेत.
केंद्रीय आरोग्य सहसचिव बंब अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. हॉटस्पॉट नसलेले सध्या 207 जिल्हे असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील विविध राज्यांचे पोलीस महासंचालक, आरोग्य सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याशी केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. ज्या राज्यांमध्ये हॉटस्पॉट आहेत तेथील कॅबिनेट सचिवांशी चर्चा केली, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.






















































