
फोर्ब्सने जगातील प्रतिष्ठत कंपन्यांची यादी मंगळवारी प्रसिद्ध केली. यात हिंदुस्थानातील 18 कंपन्यांची नावे असून इन्फोसिस जगात तिसर्या क्रमांकाची उत्कृष्ट कंपनी ठरली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (टीसीएस), एचडीएफसी या कंपन्यांचाही यादीत समावेश आहे. पहिल्यांदाच फोर्ब्सच्या यादीतील ‘टॉप फाईव्ह’ कंपन्यांमध्ये हिंदुस्थानातील कंपनीचे नाव आले आहे.
बँकिंग क्षेत्रातील व्हिसा या अमेरिकेच्या कंपनीने फोर्ब्सच्या यादीत पहिले स्थान पटकावले, तर ऑटोमोबाईल क्षेत्रातील फेरारी कंपनीचे नाव दुसर्या स्थानी आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेली इन्फोसिस कंपनी फोर्ब्सच्या गेल्या वर्षीच्या यादीत 31 व्या स्थानावर होती. यंदा या कंपनीने तिसरा क्रमांक पटकावला. यादीत नेटफ्लिक्स चौथ्या, पेपाल पाचव्या, मायक्रोसॉफ्ट सहाव्या, वॉल्ट डिजनी सातव्या, टोयोटा मोटार आठव्या, मास्टरकार्ड नवव्या, तर कॉस्टको होलसेल दहाव्या क्रमांकावर आहे. सुरुवातीच्या 50 कंपन्यांमध्ये टीसीएसने 22 वा, तर टाटा मोटर्सने 31 व्या क्रमांकावर आहे.
यादीतील इतर हिंदुस्थानी कंपन्या
टाटा स्टील (105), लार्सन ऍण्ड टुब्रो (115), महिंद्रा ऍण्ड महिंद्रा (117), एचडीएफसी (135), बजाज फिनसर्व (143), पिरामल इंटरप्रायझेस(149), स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया (153), एचसीएल टेक्नॉलॉजीज (155), हिंडाल्को इंडस्ट्रीज (157), विप्रो (168), एचडीएफसी बँक (204), सनफार्मा इंडस्ट्रीज (217), जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (224), आयटीसी (231) आणि एशियन पेंट्स (248).
सर्वाधिक कंपन्या अमेरिकेतील
जगातील 250 प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये सर्वाधिक 59 कंपन्या अमेरिकेतील आहेत. त्यापाठोपाठ जपान, चीन आणि हिंदुस्थान या तीन देशांच्या एकूण 82 कंपन्यांची नावे यादीत आहेत. गेल्या वर्षी या देशांच्या 63 कंपन्यांची नावे यादीत होती.




























































