
सामना प्रतिनिधी । मुंबई
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मुंबईत पाय ठेवू द्यायचा नाही असा निर्धार करणाऱया १९ शिवसैनिकांनी २०१० मध्ये त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन पुकारले होते. अंधेरीच्या मिठीबाई महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातच शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व शिवसैनिकांना ताब्यात घेऊन जमावबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या विरोधात खटला भरला होता. या खटल्यातून सर्व शिवसैनिकांची आठ वर्षांनी अखेर अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब यांनी याप्रकरणी सातत्याने शिवसैनिकांची बाजू उचलून धरली. न्यायालयीन प्रक्रियेत त्यांचा सतत सहभाग होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि ऍड. सुहास घाग यांनी शिवसैनिकांची बाजू अतिशय जोरदार मांडल्यामुळे सर्व शिवसैनिकांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात कलम ३७१ (१) (ई) आणि मुंबई पोलीस कायदा १३५ अन्वये सर्व शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विनायक राऊत, अनंत नर, यशोधर फणसे, राजेश भुतलकर, राजू भुतलकर, अनंत भोसले, परशुराम जाधव, उदय दळवी, रामचंद्र चंडेलिया, गणेश रामस्वामी देवेंद्र, रविचंद्र पेरास्वामी देवेंद्र, संतोष होले, हिरण्णा तेलगू, शाम सूर्यवंशी, कुलडिवासिंग करणासिंग लीडर, धर्माजी गोवडकर, ज्ञानेश्वर सावंत, दशरथ पारदळे आणि जनार्दन राऊत या शिवसैनिकांवर तब्बल आठ वर्षे खटला चालला. राहुल गांधी यांनी त्यावेळी मुंबईत येऊन लोकलमधून फिरण्याची नौटंकीही केली होती. त्यांच्या नौटंकीचा मुंबईत ठिकठिकाणी विरोधही झाला. मिठीबाई कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी राहुल गांधी यांची अक्षरशः बोलतीच बंद केली. या पार्श्वभूमीवर १९ शिवसैनिकांवर खटला दाखल करण्यात आला होता. अखेर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.


























































