निळवंडे कालव्यांसाठी 190 कोटी रुपयांचा निधी मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त भागाला वरदान ठरणाऱया निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी 190 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तो निधी नुकताच खात्यावर जमा करण्यात आला असल्याची माहिती माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिली आहे. ‘जलसंपदा’चे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्य़ांनी समाधान व्यक्त केले आहे.

निळवंडे प्रकल्पाच्या मुख्य कालव्यांचे काम जवळपास 30 टक्के, तर वितरिकांचे पूर्ण काम बाकी आहे. निळवंडे कालवा कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात ऍड. अजित काळे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल करून न्याय मागितला होता. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून काम विनाअडथळा सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी कालवा कृती समितीने माजी खासदार प्रसाद तनपुरे व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यामार्फत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार 491 कोटींची आर्थिक तरतूद केली होती.

निळवंडे कालव्यांसाठी संगमनेर तालुक्यातील भूसंपादनात 341 कोटी रुपये खर्च झाल्याने फार थोडा निधी कामासाठी शिल्लक होता. ठेकेदारांचे 60 कोटी रुपयांचे देणे थकले होते व प्रकल्पाच्या ठेकेदारांनी केलेल्या कालव्यांच्या कामाची प्रलंबित देणी व उर्वरित मुख्य कालव्यांसाठी 600 कोटी, तर वितरिकांसाठी 800 कोटी अशा एकूण एक हजार 400 कोटी रुपयांच्या निधीची तातडीची आवश्यकता होती. त्यासाठी कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे व अध्यक्ष रूपेंद्र काले, सोन्याबापू उऱहे यांनी याबाबत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची भेट घेऊन जलसंपदामंत्र्यांना निवेदन दिले होते.