बीड जिल्ह्यात रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणीत आढळले कोरोनाचे 210 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी बीड जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये  दुकानदार, व्यापारी, उद्योजक, कामगार यांचे एकाचवेळी 25 बुथवर रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट मोहिम राबविण्यात आली. पाच शहरामधील  5310 व्यापार्‍यांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात 210 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. या मोहिमेमुळे बीड जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाला खिळ बसण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दुकानदार, व्यापारी, उद्योजक, कामगार यांचे एकाचवेळी रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट मोहिम राबवण्याची सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. अंबाजोगाई, माजलगाव, केज, परळी आणि आष्टी या पाच शहरामध्ये 25 बुथवर तीन दिवस ही मोहिम राबवली जाणार  आहे. आज पहिल्या दिवशी तब्बल 5310 जणांची रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये पाच शहरामधील 210 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

परळीत तब्बल 1083 जणांची  रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात 57 जणांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. आष्टीमधील 629 दुकानदार आणि व्यापार्‍यांची टेस्ट केली त्यात 17 जण पॉझिटिव्ह निघाले,  केजमध्ये 529 दुकानदार आणि व्यापार्‍यांची तपासणी झाली.  त्यामध्ये 18 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. परळीत रात्री उशिरापर्यंत अ‍ॅन्टिजेन टेस्ट सुरू  होती. दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नटराज रंग मंदिर येथे कोरोना चाचणी केंद्राला भेट दिली आणि जास्तीत जास्त व्यापार्‍यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी मोठ्या संख्येने पुढे आले. दरम्यान बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी परळीत सुरू असलेल्या अ‍ॅन्टिजेन टेस्ट केंद्राला भेट देवून व्यापार्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परळीमध्ये नटराज सभागृह, सुभाष चौक, सरस्वती विद्यालय, पंचायत समिती येंथे रॅपिड टेस्टसाठी केंद्र उभारण्यात आले.