कश्मिरात 2 दहशतवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त

कश्मिरात निवडणुकीचे पडघम सुरू असताना दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. दहा दिवसांत दुसऱ्यांदा दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. कुपवाडा जिल्ह्यातील माछिल भागात लष्कर व पोलीस दलाने संयुक्त कारवाई करत घुसखोरीचा डाव हाणून पाडला. यावेळी दोघांचा खात्मा करत त्यांच्याजवळील दोन एके 47 रायफल, 4 हॅण्डगे्रनेड आणि 2 पिस्तुलासह मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

धुमश्चक्रीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटली नाही. मात्र नवरात्रोत्सवात मोठा घातपात करण्याचा त्यांचा कट उधळून लावला. जम्मू व कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप या भागात कारवाई सुरू आहे. शोधमोहिमेत आणखी दहशतवादी लपल्याची माहिती असून, जशाच तसे उत्तर देण्याची तयारी लष्कराच्या जवानांनी केली आहे. हिंदुस्थानच्या सीमेवर दोन्ही दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्न करत असताना सुरक्षा दलांनी प्रयत्न हाणून पाडला.

दोन दिवसांपूर्वीच कश्मिरातील पुलवामा येथील खारभाटपोरा रत्नीपोरा गावात दहशतवाद्यांनी दोन मजुरांवर गोळीबार केला होता. दोघेही बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील रहिवासी होते. शमशाद अहमद आणि पैâजान कादरी अशी मजुरांची नावे आहेत.

दहा दिवसांत पाच दहशतवाद्यांचा खात्मा
दहा दिवसांपूर्वी श्रीनगरमधील नौगाम भागात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पुलवामा येथील एजाज रसूल नजर आणि शाहिद अहमद अशी दोघांची नावे होती. अन्सार गजवत उल हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. 2 सप्टेंबर रोजी पुलवामा येथे बंगालमधील मुनीर उल इस्लाम या मजुराच्या हत्येमध्ये हे दोन्ही दहशतवादी सहभागी होते. त्याचबरोबर 12 सप्टेंबर रोजी हेफ शिरमल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असताना एका दहशतवादाचा खात्मा करण्यात आला होता. त्यामुळे दहा दिवसांत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे लष्करांच्या प्रवक्त्यांनी सांगितले.