
बंद घरांची पाहणी करून घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने, 5 मोटारी असा 29 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 11 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सनीसिंग पापासिंग दुधानी (वय 19, रा. बिराजदारनगर, हडपसर) आणि सोहेल जावेद शेख (वय 19,रा.गोसावी वस्ती, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दुधानी आणि शेख सराइत चोरटे असून त्यांच्याविरोधात घरफोडी, वाहनचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. हडपसरमधील म्हाडा कॉलनीत दुधानी आणि शेख थांबल्याची माहिती गुरुवारी रात्री तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दुधानी, शेख आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीन साथीदाराला पकडले.
त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, साडेतीन किलो चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या. त्यांनी मोटारी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 मोटारी जप्त केल्या. त्यांच्याकडून घरफोडीचे 7 गुन्हे, वाहनचोरीच 5 गुन्हे असे मिळून 11 गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.
चोरीच्या मोटारींचा घरफोडीसाठी वापर
सराईत चोरटे चोरीच्या मोटारीचा वापर घरफोडीचे गुन्हे करण्यासाठी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.





























































