
सामना ऑनलाईन । यवतमळ
यवतमाळ जिल्ह्यातल्या महागांव येथील धरणात गेल्या तीन दिवसांपासून अडकलेल्या वीस माकडांची सुटका करण्यात आली आहे. चंद्रशेखर आझाद क्रीडा मंडळाचे युवक व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या माकडांची सुटका करण्यात यश आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
दारव्हा तालुक्यातील महागांव लघुसिंचन प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढली. धरणातील एका बाभळीच्या झाडावर जवळपास 20 माकडे अडकली होती. दारव्हा-आर्णी मार्गावर प्रकल्पातील बुडीत क्षेत्रात एका बाभळीच्या झाडावर अडकलेल्या माकडांना चारही बाजूंनी पाणीच पाणी असल्याने खाली उतरता येत नव्हते. त्यामुळे तीन दिवसांपासून ती माकडे उपाशी असल्याने कासावीस झाली होती.
दरम्यान, माकडे अडकल्याची बाब महागांव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी दारव्हा विभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभाग व चंद्रशेखर आझाद क्रीडा मंडळाच्या युवकांची एक पथक तयार करून रविवारी अडकलेल्या माकडांची सुखरुप सुटका केली.


























































