अग्निसुरक्षा नसलेली 20 खासगी रुग्णालये कायद्याच्या कचाटय़ात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रुग्णालयांना आग लागून होणारी जीवित-वित्तहानी रोखण्यासाठी पालिकेकडून मुंबईभरातील सर्व रुग्णालये-नार्ंसग होमची झाडाझडती घेऊन अग्निसुरक्षेची तपासणी केली जात आहे. यामध्ये 1517 खासगी रुग्णालयांच्या सर्वेक्षणात 20 रुग्णालयांनी अग्निशमन यंत्रणा उभारण्यास वेळ देऊनही अंमलबजावणी केली नसल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

राज्यासह मुंबई-परिसरात गेल्या काही महिन्यांत रुग्णालयांना लागलेल्या आगीत जीवितहानी झाल्याने रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 9 जानेवारीला भंडारा जिल्हा रुग्णालयात शिशू केअर सेंटरला लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा बळी गेल्यानंतर हा प्रश्न आणखीनच अधोरेखित झाला.

त्यामुळे पालिकेकडून मुंबईभरातील नार्ंसग होम आणि हॉस्पिटलमधील अग्निसुरक्षेचे ऑडिट करण्यात येत आहे. आगामी काळातही रुग्णलयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी सुरूच राहणार असून अग्निशमन यंत्रणा नसल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

वीज-पाणी कापणे,टाळेबंदीची कारवाई

  • अग्निशमन यंत्रणा नसल्यास सुरुवातीला नोटीस देऊन 120 दिवसांत अग्निशमन यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले जात होते. मात्र आता दुर्घटना टाळण्यासाठी सोसायटय़ा, हॉस्पिटल, नार्ंसग होम, आस्थापनांना नोटीस देऊन एका महिन्यात कारवाईचा ‘लॉजिकल एण्ड’ करण्यात येत आहे.
  • यामध्ये नोटीस मिळाल्यानंतर एका महिन्यात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केल्याचा अहवाल पालिकेला द्यावा लागणार आहे. यामध्ये कायदेशीय-न्यायालयीन कार्यवाहीनंतर वीज-पाणी कापणे किंवा टाळेबंदीची कारवाई होऊ शकते. शिवाय रोख दंड किंवा आणखी कठोर कारवाईदेखील होऊ शकते.
  • एकूण 1517 खासगी रुग्णालयांची तपासणी. 20 ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नोटीस दिल्यानंतरही कार्यवाही झाली नसल्याने कायदेशीर कारवाई सुरू.
  • राज्य सरकारच्या 8 तर केंद्र सरकारच्या 2 रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याचे आढळले.