नाल्यात कचरा टाकाल, तर 200 रुपये दंड! प्लॅस्टिक, कचऱ्यामुळे नाले तुंबत असल्याने पालिकेचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

नाल्यांमध्ये टाकले जाणारे प्लॅस्टिक आणि कचऱ्यामुळे अतिवृष्टीत नाले तुंबून पाणी शहरात घुसत असल्याचे प्रकार समोर आल्याने पालिकेने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नाल्यांवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार असून नाल्यात कचरा टाकताना आढळल्यास 200 रुपये दंड केला जाणार आहे. याशिवाय  नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी प्रभावी जनजागृतीही केली जाणार आहे.

… म्हणूनच घेतला निर्णय

  • पालिका क्षेत्रातील मोठे नाले, छोटे नाले व मिठी नदी यांची एकूण सुमारे लांबी 689 किलोमीटर आहे. यापैकी मोठय़ा नाल्यांची लांबी ही सुमारे 248 किलोमीटर इतकी आहे. तर छोटय़ा नाल्यांची लांबी ही सुमारे 421 किलोमीटर आहे. याव्यतिरिक्त उर्वरित 20 किलोमीटर एवढी लांबी मिठी नदीची आहे.
  • नागरिकांना विविध नागरी सेवासुविधा देणारी पालिका आपल्या कार्यक्षेत्रातील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी सातत्याने अधिकाधिक प्रभावी व्यवस्था करीत असते. यामध्ये पर्जन्य जलवाहिन्या, नाले इत्यादींची साफसफाई करणे, नवीन पर्जन्य जलवाहिन्या तयार करणे आणि त्यांचे परिरक्षण करणे इत्यादी कामे नियमितपणे करण्यात येतात.