2011 वर्ल्ड कप फायनलची चौकशी सुरू

श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अल्थगामागे यांनी 2011 साली झालेल्या वन डे वर्ल्ड कपचा अंतिम सामना निश्चित (फिक्स) होता असा आरोप केल्यानंतर आता श्रीलंकन पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत आता 2011 साली श्रीलंकेचे मुख्य निवड समिती प्रमुख असलेले अरविंदा डिसिल्व्हा यांची सहा तास कसून चौकशी करण्यात आली आहे. आता सलामी फलंदाज उपुल थरंगा याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

महिंदानंद अल्थगामागे यांनी काही दिवसांपूर्वीच श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडे एक अहवाल सुपूर्द केला होता. त्यामधील नऊ पानांमध्ये या पराभवासाठी ठरलेल्या 24 कारणांचा समावेश होता. या सर्व कारणांमुळे आता तब्बल नऊ वर्षानंतर या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येत आहे. यापुढे श्रीलंकन संघासह व्यवस्थापनातील व्यक्तींनाही चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते.

बीसीसीआयनेही चौकशी करावी
माजी क्रीडामंत्र्यांच्या आरोपानंतर अरविंदा डिसिल्व्हा यांनी बीसीसीआयकडेही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीत माझी गरज पडल्यास हिंदुस्थानात यायला तयार असेन.

जयवर्धने, संगक्कारा यांनी आरोप फेटाळून लावले
हिंदुस्थानने श्रीलंकेला हरवून तब्बल 28 वर्षानंतर वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. या संस्मरणीय यशाला गालबोट लावण्याचे काम होत आहे असा सूर क्रिकेटप्रेमींमधून निघत आहे. शिवाय महेला जयवर्धने व पुमार संगक्कारा या त्यावेळच्या श्रीलंकन संघातील प्रमुख खेळाडूंनीही माजी क्रीडामंत्र्यांच्या या आरोपाचे खंडन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या