2018 मधील टीईटीमध्येही अपात्र उमेदवारांना केले पात्र, एक हजारांवर अपात्र विद्यार्थ्यांना घातल्या पायघडय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहाराची पाळेमुळे आणखीन खोलवर असल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. राज्यात 2018 मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेतही एजंटांच्या साखळीने निकालात मोठय़ा प्रमाणात फेरफार करून अपात्र उमेदवारांना पात्र केले आहे. संबंधित उमेदवारांची आकडेवारी एक हजारांवर असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्याअनुषंगाने सायबर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

म्हाडा परीक्षा पेपर फुटीप्रकरणा पुणे सायबर पोलिसांनी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह हरकळ बंधू यांना अटक केली होती. त्यांनी टीईटीमध्येही गैरव्यवहार केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी राज्य परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक साकरीकर यांना अटक केली. चौकशीत त्यांनीही 2018 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेत गैरव्यवहार केल्याची कबुली दिली होती. त्यासाठी परीक्षा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेक देरे आणि जी. ए. कंपनी मॅनेजर अश्विनकुमार यांनी मदत केल्याचे तपासात निष्पन झाले होते. त्यानुसार पुणे सायबर पोलिस 2018 मधील टीईटी घोटाळ्याचा तपास करीत होते. याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

आरोपींनी टीईटी 2018 परीक्षेत अपात्र उमेदवारांनाही पात्र केल्याचा संशय पुणे सायबर पोलिसांना होता. त्यादृष्टीने तपासानंतर आता एक हजारांवर अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित उमेदवारांचा डेटा तयार करण्यात येत आहे. एजंटांपासून शिक्षण परिषद आयुक्तांच्या साखळीने टीईटी 2019 मधील 7 हजार 900 अपात्र उमेदवारांना पात्र केले. तर 2018 मधील एक हजारांवर अपात्रांना गैरव्यवहार करीत पात्र केल्यामुळे खळबळ उडाली आहे. लवकरच संबंधितांनाही चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोवळे, उपायुक्त भाग्यश्री नकटके, एसीपी विजय पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पीआय अंकुश चिंतामण, एपीआय बलभीम ननवरे, उपनिरीक्षक अनिल डफळ, रवींद्र गवारी आदींनी केली.

असा उघडकीस आणला घोटाळा

पुणे सायबर पोलिसांकडून आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटीचा तपास सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने 2018 आणि 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतही (टीईटी) फेरफार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक साकरीकर यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. चौकशीनंतर तत्कलीन आयुक्त सुखदेक डेरे, जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक अश्विनकुमार, सौरभ त्रिपाठी यांनाही अटक करण्यात आले. त्यांच्याकडील माहितीनुसार आरोग्य भरती क पदाचेही पेपर फोडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी एजंट निशीद गायकवाड आणि राहूल लिंघोट यांना अटक केली.