21 हजार ठाणेकर धाव धाव धावले

81

सामना ऑनलाईन । ठाणे

आजची ठाणेकरांची सकाळ उजाडली ती धावाधावीने. चिमुकल्यांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सर्वांची पावले पालिका मुख्यालयाच्या दिशेने वळली. निमित्त होते 29व्या ‘महापौर वर्षा मॅरेथॉन’चे.  शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फ्लॅग ऑफ करताच ‘गेट सेट गो…..’ म्हणत सुरू झाली एकच धावाधाव. प्लॅस्टिकमुक्ती व अवयवदानाचा अनोखा संदेश देत आजची मॅरेथॉन स्पर्धा अविस्मरणीय ठरली. सर्वांच्या चेहऱ्यावर सळसळता उत्साह ओसंडून वाहत होता. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात रंजितकुमार पटेल याने अजिंक्यपद पटकावले, तर महिलांमध्ये मोनिका आथरे हिने  बाजी मारली. विजेत्यांनी लाखो रुपयांच्या बक्षिसांचे लोणी चाखले. ही स्पर्धा पाहण्यासाठी ठाणेकरांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली हाती.

या स्पर्धेत विजेता ठरलेला रंजितकुमार पटेल याने 21 किलोमीटरचे अंतर एक तास सात मिनिटांत पार केले, तर महिला गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेली मोनिका आथरे हिने 56 मिनिटे 52 सेकंदांत 15 किलोमीटरचे टार्गेट पूर्ण केले.

यावेळी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, रवींद्र फाटक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर,  स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते व जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, क्रीडा समिती सभापती दीपक वेतकर, शिक्षण सभापती विकास रेपाळे, उपायुक्त संदीप माळवी,  अशोक बुरपुल्ले, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे,  शहरप्रमुख रमेश वैती यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या