राजस्थानच्या कोटामध्ये बालमृत्यूसत्र सुरूच, गुजरातमध्येही महिन्यात 219 बालके दगावली

297
प्रातिनिधीक फोटो

राजस्थानच्या कोटामध्ये बालमृत्यूचे सत्र सुरू असतानाच गुजरातच्या अहमदाबाद आणि राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिनाभरात तब्बल 219 बालकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. बालमृत्यूच्या वाढत्या प्रमाणामुळे राज्यातील भाजप सरकारचे अपयश चव्हाटय़ावर आल्याने मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

आशियातील सर्वात मोठ्या अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डिसेंबर महिन्यात दाखल केलेल्या 455 पैकी 85 बालकांना प्राण गमवावा लागला. हॉस्पिटलचे अधीक्षक जी. एस. राठोड यांनी रविवारी ही माहिती दिली. या हॉस्पिटलमध्ये तीन महिन्यांत 253 बालके दगावली. नोव्हेंबरमध्ये 74, तर ऑक्टोबरमध्ये 94 बालकांचा मृत्यू झाला. राजकोट हॉस्पिटलमध्ये महिनाभरात 134, तर गेल्या वर्षभरात 1235 नवजात बालके दगावली. या हॉस्पिटलमध्ये अडीच किलोपेक्षा कमी वजनाच्या बालकांवर उपचाराची व्यवस्थाच नाही. दुसरीकडे जामनगरमध्ये वर्षभरात 639 बालकांचा मृत्यू झाला. कुपोषण, जन्मापासून व्याधी, आई कुपोषित असणे ही बालकांच्या मृत्यूची कारणे असल्याचे बोलले जात आहे. बालमृत्यू रोखण्यात भाजप सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री रूपाणी यांची बोलती बंद

राज्यातील बालमृत्यूच्या प्रश्नावर मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अजून काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. रविवारी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी त्यांना बालमृत्यूबाबत प्रश्न केला. त्यावर त्यांनी काहीच उत्तर न देता तेथून काढता पाय घेतला.

राजस्थानच्या तीन जिह्यांत 281 बालकांचा मृत्यू

राजस्थानच्या तीन जिह्यांत महिनाभरात 281 बालकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोटा येथील जे. के. हॉस्पिटलमध्ये 111 बालके दगावल्यानंतर बिकानेर आणि बुंदी जिह्यातही निरागस बालके दगावल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे राज्यातील गेहलोत सरकारवर विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या