सागरी गुंडगिरी, समुद्रात सुरुंग पेरणे थांबवा! होर्मुझ सामुद्रधुनीवरून युएई, फ्रान्स, जर्मनी, जपानसह 22 देशांचा इराणला कडक इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलने युद्ध सुरू केले. 28 फेब्रुवारीपासून युद्धाचा भडका उडाला आणि बघता बघता या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसू लागला. अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जगभरात इंधन तुटवड्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचे पडसाद आता जागतिक स्तरावर उमटण्यास सुरुवात झाली असून युएई, फ्रान्स, जर्मनी, जपानसह जगातील 22 प्रमुख देशांनी एक संयुक्त निवेदन जारी करत इराणच्या या कारवाईचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. तसेच होर्मुझ सामुद्रधुनी खुली करून समुद्रात सुरुंग पेरणे आणि व्यापारी जहाजांवरील हल्ले तातडीने थांबवण्याचे आवाहन या देशांनी केले आहे.

संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, जपान, कॅनडा, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, डेन्मार्क, लाटविया, स्लोव्हेनिया, एस्टोनिया, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, झेचिया, रोमानिया, बहरीन, लिथुआनिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या नेत्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत संयुक्त निवेदन दिले आहे. खाडीतील नि:शस्त्र व्यापारी जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्यांचा, तेल आणि वायू प्रकल्पांसह नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा आणि इराणी सैन्याने होर्मुझची सामुद्रधुनी प्रत्यक्षात बंद पाडल्याचा आम्ही कडक शब्दांत निषेध करतो, असे यात नमूद करण्यात आले आहे.

तेल आणि गॅस प्रकल्पांसह व्यापारी जहाजांवर इराणकडून होणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले ही सागरी गुंडगिरी असल्याचे या देशांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार समुद्रातून जहाजांच्या मुक्त दळणवळणाचा अधिकार अबाधित राखला पाहिजे, असे या देशांनी ठामपणे मांडले आहे. तसेच इराणने तत्काळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठराव 2817 चे पालन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

ब्रिटनची पाणबुडी अरबी समुद्रात दाखल

दरम्यान, वाढता तणाव पाहता ब्रिटनने आपली अत्यंत आधुनिक आणि अण्वस्त्रधारी पाणबुडी HMS ANSON अरबी समुद्रात तैनात केली आहे. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, ही पाणबुडी दीर्घकाळ पाण्याखाली राहू शकते आणि ती टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. संघर्ष वाढल्यास ही पाणबुडी थेट इराणवर हल्ला करण्यास सक्षम असल्याचे सांगितले जात आहे.

सुरुंग हटवण्यासाठी जपान पुढाकार घेणार

मध्य पूर्वेत सुरू असलेले युद्ध थांबले तर जपान होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरुंग हटवण्यासाठी आपली लष्करी मदत पाठवण्याचा विचार करू शकतो, असे जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी यांनी म्हटले. याच मार्गावरून जपान आपल्या गरजेच्या 90 टक्के इंधनाची वाहतूक करतो. त्यामुळे हा मार्ग बद होणे जपानसाठीही चिंतेचा विषय ठरला आहे.

Iran US Israel War – इराणविरोधात ब्रिटनची मोर्चेबांधणी; अरबी समुद्रामध्ये अण्वस्त्रधारी पाणबुडी HMS Anson तैनात