
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
गौरव काळे हा वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी हिंदुस्थानी लष्करात लेफ्टनंट झाला. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीतील एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गौरवचे लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीत शनिवारी पासिंग आऊट परेड झाली. या परेडनंतर झालेल्या पिपिंग सेरेमनीमध्ये त्याच्या आई-वडिलांनी गौरवला लेफ्टनंटसाठी असणारे स्टार लावले. यावेळी गौरवचे नातेवाईकही उपस्थित होते. गौरव हा पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (एनडीए) १३२ व्या तुकडीचा विद्यार्थी आहे. त्याने एनडीएमधील खडतर प्रशिक्षण गतवर्षी पूर्ण केले. गौरव येथील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असून तो तलवारबाजीचा राष्ट्रीय खेळाडूही आहे. त्याने क्रीडा प्रकारात अनेक पारितोषिके मिळविली.
चित्र बदलले पाहिजे
दहावीत असताना लष्करात अधिकारी होण्याचे ठरविले, त्या दिशेने प्रयत्न केले. निवृत्त ब्रिगेडीयर बलजितसिंग गिल, निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर, मोहन सोन्नेकर, एसपीआयचे आर. एस. मानेकर, प्रकाश कुलकर्णी यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभले. लष्करी सेवेतून देशसेवा करण्याची मोठी संधी मिळाली आहे, हे मी माझे भाग्य समजतो. आपल्या भागातील युवक अधिकारी होण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. हे चित्र बदलले पाहिजे, असे वाटते – गौरव काळे
































































