मुंबईत 2200 कोटींचे 19 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

मुंबईतील गोठे इतरत्र हलविण्यासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल; मात्र हे गोठय़ातून नद्यांमध्ये जाणारे शेण, मलमूत्र थांबविण्यासाठी जवळपास 2200 कोटी रुपयांचे 19 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

मुंबईतील दहिसर, ओशिवरा, पोईसर आणि मिठी नदी परिसरातील गुरांच्या गोठ्यांचे मलमूत्र नद्यांमध्ये सोडण्यात येत असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे गोठे इतरत्र हलविण्यात येण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना, दहिसर येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प 2024 तर पोईसरचा 2026 आणि ओशिवरा येथील प्रकल्प 2026 मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून लवकरच अंतिम सुनावणी होणे अपेक्षित आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढची कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.