रेमडेसिवीरची 2 हजार 200 इंजेक्शन केली जप्त; मरोळ आणि मरीन लाइन्स येथे टाकले छापे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मरोळ आणि मरीन लाइन्स येथे कारवाई करून 2 हजार 200 रेमडेसिवीरची इंजेक्शन जप्त केली आहेत. जप्त केलेली इंजेक्शन एफडीएकडे देण्यात आली आहेत.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त असणाऱया रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी धडपड करावी लागत आहे. तर काही जण या इंजेक्शनचा काळाबाजार करून महागडय़ा किमतीत विकत आहेत. काही औषध वितरकांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा करून ठेवल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर सोमवारी मुंबई पोलीस आणि एफडीएने संयुक्त कारवाई केली.

या कारवाईसाठी 4 पथके तयार केली गेली. या पथकांनी मरोळ आणि मरीन लाइन्स येथे छापा टाकला. मरोळ येथून दोन हजार तर मरीन लाइन्स येथून 200 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केली. रेमडेसिवीर इंजेक्शनची परस्पर विक्री करणे बंदी असतानाही वितरकांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा केला होता. पोलिसांनी कारवाई करून तो इंजेक्शनचा साठा एफडीएच्या ताब्यात दिला आहे. तर जप्त केलेली ती इंजेक्शन रुग्णालयाला देण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.