मुंबईत ‘तौकते’ने 2364 झाडे उखडली, किनाऱयावरील अनेक बोटींचा चक्काचूर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत रविवारी रात्रीपासून अक्षरशः थैमान घातलेल्या ‘तौकते’ चक्रीवादळाने तब्बल 2364 झाडे उखडून टाकली आहेत. ऐतिहासिक 114 किमी ताशी वेगाने वाहणाऱया वाऱयामुळे किनाऱयावर आलेल्या प्रचंड उधाणाने अनेक बोटींचा अक्षरशः चक्काचूर झाल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. शिवाय बोटींच्या दोन अपघातांत अजूनही दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. मुंबईत 56 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या तर 43 घर-भिंती पडल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. दरम्यान, वरळी बीडीडी चाळ येथे वडाचे झाड अंगावर पडलेल्या संगीता खरात (45) या महिलेचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकण किनारपट्टीला ‘तौकते’ वादळाने अक्षरशः झोडपून काढले. गोव्यापासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर किनारपट्टीवर वादळाचा मोठा फटका बसला. कोकण किनारपट्टीवर 15 मे रोजी धडकलेल्या वादळाचा 16 आणि 17 मे रोजी मुंबईला धोका असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते. मात्र मुंबईत 17 मे रोजी रविवारी रात्रीपासून खऱया अर्थाने प्रभाव सुरू झाला. गेल्या कित्येक वर्षांत न वाहलेले तुफानी वारे यावेळी नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. शिवाय मुसळधार वादळी पाऊस झाल्याने नागरिकांच्या उरात धडकी भरवली होती.

अशी झाली पडझड

  • मुंबई शहरात एकाच दिवसात झाडे-फांद्या पडल्याच्या 666 तक्रारी आल्या. तर पूर्व उपनगरात 595 तर पश्चिम उपनगरात 1103 अशा एकूण 2364 तक्रारी दाखल झाल्या. दोन बोटींच्या अपघातात 1 मृत्यू आणि 2 बेपत्ता आहेत.
  • शहर, पूर्व उपनगरात प्रत्येकी 18 ठिकाणी आणि पश्चिम 7 ठिकाणी घर-भिंती पडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये 9 जण जखमी झाले. तर शहरात 21 ठिकाणी, पूर्व उपनगरात 4 आणि पश्चिम उपनगरात 31 ठिकाणी पाणी तुंबले.

मच्छीमारांना 35 कोटी रुपये मदत निधी देण्याची मागणी

वादळात मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले असल्याने प्रशासनाने सर्व किनारपट्टीचे तातडीने सर्वेक्षण करून मदत द्यावी अशी मागणी मच्छीमार बांधवांकडून करण्यात येत आहे. नुकसानीचे पंचनामे करून त्वरित ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा असे आवाहनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मत्स्य व्यवसायमंत्री यांना केल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी सांगितले.

नॅशनल पार्कमध्ये शेकडो झाडे भुईसपाट

वादळी वाऱयाने नॅशनल पार्कमधील शेकडो झाडे भुईसपाट झाली. यामध्ये रस्त्यासह जंगलातील अनेक वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती आरएफओ शैलेश देवरे यांनी दिली. नॅशनल पार्कमध्ये वादळाने पडलेल्या झाडांमध्ये गुलमोहोर, विलायती शिरीष (रेन ट्री) सारख्या वृक्षांचा समावेश होता. या वृक्षांमध्ये भक्कमपणा कमी असल्याने मुसळधार वादळी पावसात त्यांचा निभाव लागत नाही. यामुळे आगामी काळात नॅशनल पार्कमध्ये वड, पिंपळसारख्या देशी पाच हजार वृक्षांचे रोपण केले जाणार असल्याचे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये पाच ते सहा फूट उंचीच्या वृक्षांचे रोपण केले जाणार असून पुढील काही वर्षांत ही रोपटी विशाल वृक्षांच्या स्वरूपात पाहायला मिळतील, असा विश्वास वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश देवरे यांनी व्यक्त केला आहे.

ठाणे ग्रामीण, पालघर, रायगडात 30 तास ब्लॅकआऊट

 ‘तौकते’ वादळाच्या तडाख्याने रायगड जिल्ह्यात सर्वाधिक सहा हजार घरांचे नुकसान झाले असून मच्छीमार, आंबा बागायतदार, नारळ, सुपारी यालाही फटका बसला. ठाणे जिह्याचा ग्रामीण परिसर व रायगडात अनेक ठिकाणी 30 तासांहून अधिक काळ ‘ब्लॅकआऊट’ला सामोरे जावे लागले. शेकडो विजेचे खांब कोसळल्याने तसेच ट्रान्सफॉर्मर्सची वाट लागल्याने लाखो नागरिकांनी भीतीच्या सावटाखाली सोमवारीची रात्र जागून काढली. पालघर जिह्यातही ब्लॅकआऊट झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अलिबाग, नागोठणे,  वसई-विरार, ठाणे ग्रामीणमधील शहापूर, मुरबाड, वासिंद, भिवंडी, कसारा भागही अंधारात गेला आहे.