
एका चोराला पंखां चोरणं उशिराने का होईना मात्र चांगलंच महागात पडलं आहे. तब्बल 23 वर्षानंतर या पंखा चोराला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या चोराला 1 वर्षाचा तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मध्यप्रदेश येथील इंदूरमध्ये 23 वर्षांपूर्वी दोन पंख्यांची चोरी झाली होती. 23 मार्च 1998 या दिवशी शंकर नावाच्या व्यक्तीने एका दुकानातील दोन पंखे चोरले होते. शंकर पळून जाण्याच्या तयारीत असताना दुकानाच्या पहारेदाराने त्याला पकडलं होतं. त्याच्या झडतीमध्ये चोरलेले दोन पंखे सापडले होते. 23 वर्षांपूर्वी या 2 पंख्यांची किंमत जवळपास 500 रुपये एवढी होती. शंकरला पकडल्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. कालांतराने शंकरची जामिनावर सुटका झाली होती. जामिनावर सुटताच शंकर फरार झाला होता. त्याचा शोध लागेपर्यंत हे प्रकरण प्रलंबित राहिले होते
शंकरला पोलिसांनी पुन्हा पकडल्यानंतर त्याच्याविरूद्ध सुरू असलेला हा खटला पुन्हा सुरू झाला होता. शंकरचे वय सध्या 55 वर्ष इतके असून त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भूपेंद्र आर्य यांनी शिक्षा सुनावली. मंगळवारी शंकरला ही शिक्षा सुनावण्यात आली असून त्याला आता एक वर्षांचा कारावास आणि एक हजार रुपये रक्कम दंड ठोठावला आहे.



























































