बेवडा‘बंदी’चे गुजरात मॉडेल, विधवा महिलांनी घडवली क्रांति

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील काही गावांनी पुरुषांची दारू सोडवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. पिणार्‍या माणसाला चक्क पिंजर्‍यात बंद केले आहे. आश्चर्य म्हणजे या शिक्षेमुळे अनेक पुरुषांनी दारू सोडली असून आजुबाजुच्या गावांनीही दारू बंदीसाठीचे हे ‘मॉडेल’ स्विकारले आहे. या अभियानात महिलांनीही कळीची भुमिका बजावली आहे.

अहमदाबाद जिल्ह्यातील मोतीपुरा गावात नट समाज मोठ्या प्रमाणात राहतो. या समुदायातील पुरुषांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण खूप वाढले होते. इतके की दारूमुळे आतापर्यंत 100 हून अधिक महिला विधवा झाल्या आहेत. गावातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी सरपंच बाबु नायक यांनी शक्कल लढवली. दारू पिणार्‍या व्यक्तीला एका पिंजर्‍यात रात्रभर डांबून ठेवले जाईल. आणि त्यांच्याकडून हजार बाराशे रुपयांचा दंड आकारला जाईल. गावाने ही कारवाई करण्यास सुरूवात केल्यानंतर दारू पिण्याचे प्रमाण कमी झाले. अनेक तळीरामांना गावकर्‍यांनी रात्रभर एका पिंजर्‍यात डांबून ठेवले. त्यांच्याकडून दंड घेतल्यानंतरच त्यांची सुटका करण्यात आली.

या मोहीमेत एका दारुड्याला रात्रभर पिंजर्‍यात डांबण्यात येते. तसेच पुन्हा दारू प्यायल्यास सामाजिक बहिष्काराची धमकी दिली जाते. रात्रभर पिंजर्‍यात राहिल्याने दारुड्या माणसाला स्वतःचीच लाज वाटते. पिंजर्‍यात डांबून ठेवलेल्या व्यक्तीला फक्त पाण्याची एक बाटली दिली जाते. त्याच्याकडून दंड घेतला जातो आणि पुन्हा दारू न पिण्याची ताकीद दिल्यानंतर त्याला सोडले जाते.

या मोहीमेत विधवा महिलांनी कळीची भूमिका पार पाडली. गावात अनेक महिलांच्या पतीचे दारूमुळे निधन झाले. त्यांनी दारू पिणार्‍या तरुणांचे आणि पुरुषांची माहिती गावकर्‍यांना देण्यास सुरूवात केली आणि गावकर्‍यांनी या दारुड्यांना पिंजर्‍यात बंद केले. दंडाची रक्कम नंतर विधवा महिलांना बक्षीस म्हणून देण्यात आली.

मोतीपुरा गावातील ही मोहीम इतकी यशस्वी झाली की हे ‘मोतीपुरा मॉडेल’ आसपासच्या अनेक गावांनी स्विकारले. आता चार जिल्ह्यातील 23 गावांनी हे मॉडेल स्विकारले असून गाव नशामुक्ती करण्याचा निर्धार केला आहे.

मोतीपुरा गावात या मोहीमुळे घरगुती हिंसाचाराचे प्रमाण 90 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा सरपंच बाबु नायक यांनी केला आहे. तसेच दंडाची रक्कम 2300 रुपयांनी वाढवली असून ही रक्कम विधवा महिलांना दिली जाते तसेच गावात समाजपयोगी कामासाठीही ही रक्कम वापरली जात असल्याचे नायक यांनी सांगितले.