
सामना ऑनलाईन, पुणे
पुण्यात मेट्रो जमिनी वरुन करायची की जमिनी खालून यावर फार विचार झाला. त्यामुळे मेट्रोचे काम मागे पडले.पुण्यात काम करत असताना वेगवेगळी मतं असतात. जगाला विचार देण्याची मक्तेदारी पुण्याचीच आहे. ती मान्य केलीच पाहिजे अशी कोपरखळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारली. मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर पहिल्या वर्षात ते साधारणपणे १५ टक्के होते. मात्र पुणे मेट्रोचे काम पहिल्याच वर्षी २५ टक्के केले असुन ते वेळेत पुर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुणे महापालिका आणि महामेट्रो यांच्या वतीने कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ , भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले , महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित ,स्थानिक नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुर्षी खर्डकर आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मेट्रोच्या माध्यतातुन पुण्यात वाहतुकीचे मोठेजाळे तयार केले जात आहे. जगाच्या पाठीवर शाश्वत विकास असलेल्या शहराची सर्वाजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम असते. पुण्यात कितीही रस्ते, पुल बांधले तरी ते अपुरे पडत आहेत. पुण्याच्या आजूबाजूला मोठया कंपन्या आहेत. त्यामुळे रोजगार आणि गाडया मोठया प्रमाणात निर्माण होतात. वाहतुकीची कोंडी संपवायची असेल तर सर्वाजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे.त्याला मेट्रो हा चांगला पर्याय आहे. मेट्रो हे वेगवान असते. मेट्रोचे स्टेशन जवळ असते. मेट्रोमुळे प्रदुषण होत नाही. मेट्रोच्या क्षमतेतही वाढ करता येउ शकते. रान्सपोर्ट सिस्टीमचे इंटिग्रेशन केले आहे.
एका तिकिटावर इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम
स्वारगेट येथे एसटी डेपो , पीएमपीएल आणि आता मेट्रो येणार आहे. त्यामुळे स्वारगेटला इंट्रिग्रेटेड हब तयार केले आहे. त्यासाठी वल्र्ड क्लास डिझाईन तयार केले आहे. मुबंईत बीएसटी, मेट्रो, मोनो रेल्वे, वॅॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. एका तिकिटावर ही इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टिीम आणली जात आहे. आपल्या मोबाईलवर ट्रान्सपोटचे स्स्टिीमचे अपडेट मिळतील. आपल्या घरापर्यत सहज प्रवास करता येईल. पुण्यातही पीएमपीएल आणि मेट्रोसाटी ही सिस्टीम राबविता येईल.इ- बस घेतल्या पाहिजे. प्रदूषण वाढल्यामुळे पुण्यातील तापमान वाढले आहे. पुण्यात विविध प्रकल्प राबविले जात आहे. त्यामाध्यमातुन पुण्याला अतिशय सुंदर शहर बनविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्याचे बदलते स्वरुप पाहयला मिळेल असे फडणवीस यांनी सांगितले.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे जानेवारीत काम सुरु
शिवाजीनगर ते हिजंवडी मेट्रो हा देशातील पीपीपी तत्वावरील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम पीएआरडीच्या माध्यमातुन जानेवारी मध्ये सुरु होणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. पालकमंत्री गिरीश बापट, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे भाषण झाले. मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी आभार मानले.
कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सुटावी यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मुरलीधर मोहोळ यांनी या उडडाणपुलासाठी ३५ कोटीची तरतुद केली. पालिका आणि महामेट्रोच्या माध्यमातुन हा उडडाणपुल उभा राहत आहे. हा पुल पथदर्शी प्रकल्प ठरेल. त्यासाठी मुरलीधर मोहोळ यांचे आभार मानत असुन त्यांना शुभेच्छा देत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बापटाच्या हातून सुटलेला नारळ काकडेंनी फोडला
दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन करताना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हातून वाढवण्यासाठी घेतलेला नारळ सुटला तो दूर गेला. त्यावर खासदार संजय काकडे यांनी तो नारळ हातात घेउन फोडला. त्यामुळे बापट यांच्या हातून सुटलेला नारळ काकडे यांनी वाढविला अशी चर्चा रंगु लागली.
































































