शहराला नशेचा विळखा! वाळूज पोलीस ठाण्याच्या नाकासमोर नशेचा बाजार; कफ सिरपच्या अडीच हजार बाटल्या जप्त, अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाची कारवाई

वाळूज पोलीस ठाण्याच्या नाकासमोर भरलेला नशेचा बाजार अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने उठवला. उत्तर प्रदेशातून आलेल्या ‘रायटस’ कंपनीच्या अडीच हजार कफ सिरपच्या बाटल्या व्हीआरएल लॉजिस्टिक कंपनीतून जप्त करण्यात आल्या. या कारवाईपासून वाळूज पोलिसांना चार हात दूर ठेवण्यात आल्यामुळे अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाची कारवाई यशस्वी झाली हे विशेष! या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, यापैकी तिघे छत्रपती संभाजीनगरचे तर एक जण चाळीसगावचा आहे.

छत्रपती संभाजीनगरला चोहोबाजूने नशेची मगरमिठी पडली आहे. नारेगाव, चिकलठाणा, पडेगाव, हसूल, पैठणरोड, वाळूज अशा शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांच्या डोळ्यांदेखत नशेचा बाजार भरतो. नशेच्या गोळ्या खुलेआम विकल्या जातात. शहरातील महाविद्यालयांच्या बाहेरही नशेच्या गोळ्यांचे पेडलर मुक्तपणे फिरत असतात. शहरातील तरुणाई नशेच्या अधीन होत असताना पोलीस मात्र गुंगीतच आहेत. शहरात फोफावलेल्या नशेच्या बाजाराविरुद्ध विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसांची गुंगी उतरली. गेल्या पंधरा दिवसांत पोलिसांनी तोंडदेखल्या कारवाया केल्या. अमली पदार्थ विकणारांची धिंड काढण्यात आली. परंतु, नशेचा बाजार मात्र जोमात सुरू आहे.

बाटलीची किंमत ५०० रुपये!

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ‘रायटस’ कंपनीच्या खोकल्याच्या औषधाच्या बाटलीवर १७५ रुपये किंमत आहे. मात्र, नशेखोरांना ही वाटली ४०० ते ५०० रुपयांना विकण्यात येते. या औषधात कोडेन फॉस्फेट, ट्रायप्रोलिडीन हे घटक असून, हे थेट मेंदूवरच परिणाम करतात.

खोकल्याच्या औषधातून नशा

वाळूज पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लांजी रोडवर व्हीआरएल लॉजिस्टिक ही पार्सल कंपनी आहे. या कंपनीत उत्तर प्रदेशातून नशेच्या बाटल्या आल्याची माहिती अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला मिळाली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने सापळा रचून कंपनीत छापा टाकला. कंटेनरमधून २० खोके ताब्यात घेण्यात आले. या खोक्यांमध्ये ‘रायटस’ कंपनीचे खोकल्याचे औषध आढळले. ही बाटली नशेखोर अख्खी नरडधात रिती करतात. पथकाने औषधाच्या अडीच हजार बाटल्या ताब्यात घेतल्या. हे पार्सल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाणार होते. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी तिघे छत्रपती संभाजीनगरचे तर एक जण चाळीसगावचा आहे.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार घटनास्थळी अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने या कारवाईची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना देताच त्यांनी संध्याकाळी साडेसात वाजता थेट व्हीआरएल लॉजिस्टिकच्या कंपनीत धाव घेतली. या कारवाईबद्दल अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. या प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

वाळूज पोलिसांना बाजूला ठेवले म्हणूनच…

वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोस अवैध धंदे सुरु आहेत. वाळूज पोलिसांचे अवैध धंदे चालवणारांबरोबर मधूर संबंध आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाईच होत नाही. वाळूज पोलीस ठाण्याच्या नाकासमोर नशेचा उद्योग चालू होता. परंतु पोलीस आयुक्तांनी या कारवाईपासून वाळूज पोलिसांना चार हात दूरच ठेवले. संपूर्ण कारवाई होईपर्यंत वाळूज पोलिसांना थांगपत्ताही नव्हता. वाळूज पोलिसांना या कारवाईपासून दूर ठेवल्यामुळेच छापा यशस्वी झाला अशी चर्चा घटनास्थळी होती.