
सध्याच्या घडीला हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील एकूणच तणावाची स्थिती पाहता विमानसेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हिंदुस्थानी सशस्त्र दलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात 26 हून अधिक लोक मारले गेले होते, त्यानंतर विमानतळ बंदी आणि उड्डाण रद्दीकरणाची मालिका सुरू झाली आहे.

यामध्ये देशभरातील तब्बल 26 विमानतळांवर नागरी विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळे बहुतांशी विमान कंपन्यांनी आता प्रवाशांसाठी नवीन नियमावली लागू केलेली आहे. इतकेच नाही तर आता एअर इंडियाने प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केलेली आहे. या नियमावली अंतर्गत उड्डाणाच्या वेळेच्या किमान तीन तास आधी पोहोचण्याचे आवाहन एअर इंडियाकडून करण्यात आलेले आहे. नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरो यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांमुळे चेक-इन प्रक्रिया उड्डाणाच्या 75 मिनिटांपूर्वी बंद करण्यात येणार असल्याचे, एअर इंडियाने म्हटले आहे.
देशभरामध्ये सध्याच्या घडीला इंडिगो या विमान कंपनीने 10 मे सकाळपर्यंत 165 पेक्षा अधिक फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर स्पाईसजेटने धर्मशाला, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसर यासह उत्तर भारतातील उड्डाणे रद्द केली आहेत. ही रद्द झालेली उड्डाणे पुढील आदेशापर्यंत रद्द राहणार आहेत. सध्याच्या घडीला देशातील एकूण वातावरण पाहता, राजधानी दिल्लीमधील विमानतळावर 90 उड्डाणे रद्द करण्यात केली आहेत. यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचाही समावेश करण्यात आलेला आहे.
खालील 26 विमानतळांवर सध्या नागरी उड्डाण सेवा बंद आहे.
चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुंतर, किशनगड, पाटियाला, शिमला, कांगडा-गग्गल, बठिंडा, जैसलमेर, जोधपूर, बीकानेर, हलवारा, पठानकोट, जम्मू, लेह, मुंद्रा, जामनगर, हीरासर, पोरबंदर, केशोद, कांडला, भुज, हिंडन, शिमला


























































