क्रीडा विश्वात हिंदुस्थानचा तिरंगा डौलाने फडकविणार्या क्रीडारत्नांचा राष्ट्रपती भवनात एका शाही कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सर्वप्रथम प्रशिक्षकांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर प्रशिक्षक ‘जीवनगौरव’ व मग ‘अर्जुन’ पुरस्कार सोहळा पार पडला. क्रिकेट वर्ल्ड कप गाजविणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना ‘अर्जुन’ पुरस्काराने गौरविण्यात आले असून यात साताऱयाची सुवर्णकन्या अदिती स्वामी आणि नागपूरच्या ओजस देवतळे यांचाही समावेश आहे.
तीन प्रशिक्षकांना ‘जीवनगौरव’
गोल्फ प्रशिक्षक जसकिरतसिंग ग्रेवाल, ई. भास्करन (कबड्डी, प्रशिक्षक), जयंतकुमार पुसीलाल (टेबल टेनिस, प्रशिक्षक) यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पाच प्रशिक्षकांना ‘द्रोणाचार्य’
गणेश देवरुखकर (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आर. बी. रमेश (बुद्धिबळ) आणि शिवेंद्र सिंग (हॉकी) यांना ‘सर्वोच्च कोचिंग सन्मान द्रोणाचार्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खेलरत्न पुरस्कारार्थीच गैरहजर
सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या स्टार बॅडमिंटन जोडीला देशातील सर्वोच्च ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कार मिळाला, मात्र पुरस्कार सोहळय़ासाठी त्यांना आज राष्ट्रपती भवनात हजर राहता आले नाही. दोघेही खेळाडू सध्या मलेशियात एका स्पर्धेसाठी गेलेले आहेत. या स्पर्धेत चांगली कामगिरी करून ऑलिम्पिक कोटा मिळविण्याचा सात्त्विक-चिराग जोडीचा निर्धार आहे. मलेशियातून परतल्यानंतर ते आपला ‘खेलरत्न’ पुरस्कार स्वीकारतील.
महाराष्ट्राचा आवाज
मुंबईकर आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीने सात्त्विकसाईराज रांकीरेड्डीच्या साथीने खेलरत्न पुरस्कार पटकावला. त्याचबरोबर तिरंदाजीत ओजस देवतळेसह अदिती स्वामीनेही अर्जुन पुरस्काराला गवसणी घातली. तिरंदाजीत महाराष्ट्राचा आवाज घुमला. तसेच मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकरने द्रोणाचार्य जिंकून मराठमोळ्या खेळाची छाती अभिमानाने फुगवली.