
कुत्र्याच्या चाव्यामुळे होत असलेल्या जीवघेण्या रेबीजला आळा घालण्यासाठी पालिकेने राबवलेल्या पाच दिवसीय पल्स अँटी रेबीज लसीकरण मोहिमेत 26 हजार 951 कुत्र्यांना डोस देण्यात आले. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 या कालावधीत ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेसाठी वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज (डब्लूव्हीएस-एमआर) या संस्थेचे सहकार्य लाभले.
पशुवैद्यकीय विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी सांगितले की, पालिका अधिकार क्षेत्रातील ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलच्या हद्दीला लागून असलेल्या 10 प्रशासकीय विभागांतील भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेत श्वान पकडणारे प्रशिक्षित स्वयंसेवक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य आदींनी अहोरात्र मेहनत घेत सूक्ष्म व्यवस्थापन आणि उत्तम अंमलबजावणीच्या बळावर ही मोहीम यशस्वी करून दाखवली आहे.
भटक्या कुत्र्यांसंबंधी केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिपणी केली आहे. भटक्या कुत्र्यांच्या तुलनेत माणसाला जास्त प्राधान्य द्यायला हवे. हे भटके कुत्रे समाजासाठी धोका निर्माण करीत आहेत. श्वानप्रेमींनी प्रिंट आणि व्हिज्युअल मीडियात लिहिण्याऐवजी त्यांच्या सुरक्षेसाठी स्थानिक सरकारी संस्थेची मदत करण्यासाठी पुढे यावे, असे न्यायमूर्ती पीव्ही कुन्हिकृष्णन यांनी म्हटले आहे.

























































