अबब! एसआरए मुख्यालयात रद्दीचा डोंगर, प्राधिकरण रद्दीच्या विक्रीसाठी लवकरच टेंडर काढणार

एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात तब्बल 26 टन रद्दी जमा झाली आहे. रद्दीचा हा डोंगर सध्या एसआरए मुख्यालयाच्या दर्शनी भागात उभा असून येणाऱ्या-जाणाऱयांचे लक्ष वेधतोय. लवकरच या रद्दीच्या विक्रीसाठी प्राधिकरणाकडून टेंडर काढण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत एसआरएने मुख्यालयात स्वच्छता अभियान राबवले होते. त्याअंतर्गत जुने आणि कालबाह्य झालेले कॉम्प्युटर, टेबल, खुर्च्या आणि कपाटे यांची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच कार्यालयातील वर्षानुवर्षे पडलेल्या फायलींचे आवश्यकतेनुसार अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी अनावश्यक असलेली कागदपत्रे रद्दीत टाकण्यात येणार आहेत. अजूनही रद्दी काढण्याचे काम सुरू असल्यामुळे सध्या ही रद्दी मुख्यालयाच्या प्रवेशव्दारासमोरच रचून ठेवण्यात आली आहे. तसेच आगीसारखी घटना घडू नये येथे अग्निरोधक यंत्रणादेखील सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

आतापर्यंत 4 कोटी कागदपत्रांचे स्पॅनिंग

वर्गीकरण झाल्यानंतर फायली आणि कागदपत्रांचे स्पॅनिंग करून सुरक्षित जतन करण्यासाठी गोडाऊनमध्ये पाठवली जाणार आहेत. स्टॉक होल्डिंग का@र्पोरेशन या पंपनीला या फायलींच्या स्पॅनिंगची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार एसआरएच्या आतापर्यंत सुमारे चार कोटी कागदपत्रांचे स्पॅनिंग करण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.