‘कर्जमाफी करू, तुमचा सातबारा कोरा करू’ अशी आश्वासने देणाऱ्या महायुतीने सत्तेत येताच शब्द फिरवला. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाच्या गळय़ाभोवती फास घट्ट आवळला गेला असून शेतकरी आत्महत्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात तीन महिन्यांत 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात मार्च महिन्यात 106 शेतकऱ्यांनी जीवन संपवले असून त्यातील तब्बल 71 आत्महत्या एकटय़ा बीड जिल्ह्यातील आहेत.
राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक संकटांना आव्हान देत शेतकरी नांगर धरून पीक उगवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी कर्जाचे ओझे, हमीभाव नाही अशा दुहेरी कात्रीत तो सापडला आहे. त्यातच एक रुपयात पीक विमा योजनाही बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्यातून खासगी सावकारांचा पाश शेतकऱ्यांच्या गळय़ाभोवती आवळत चालला असून या सर्वांतून आलेल्या नैराश्यातून शेतकरी स्वतःचे जीवन संपवत आहेत.
– नैसर्गिक संकटे आणि सरकारची शेतकऱ्यांच्या विरोधातील धोरणे यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. त्यातून विदर्भ आणि मराठवाडय़ात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नव्याने पुढे आली आहे.
– 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या पहिल्या तीन महिन्यांत विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांत 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एकटय़ा मार्च महिन्यात 106 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
आत्महत्यांमागील प्रमुख कारणे
मागील खरीप हंगामात या शेतमालाचे दर हमीभावाच्या खाली येत होते. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे उत्पादकता घटली. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. त्यातून कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि त्यामुळे आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.
– आता ऐन उन्हाळय़ाच्या दिवसात हवामान खात्याने विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कृषी खात्याची आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडणार आहे.
जिल्हा आत्महत्या
बीड – 71
संभाजीनगर – 50
हिंगोली – 37
परभणी – 33
धाराशीव – 31
लातूर – 18
जालना – 13
फडणवीस, दादा, दाढीची मतांसाठी लबाडी
कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देत महायुतीने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची मते मिळवली आणि सत्तेत येताच शब्द फिरवला. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तर ‘तो मी नव्हेच…’ असा पवित्रा घेत, शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेच नव्हते, असे सांगून आता हात झटकले आहेत.