27 गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका मागणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, नगरविकास मंत्र्यांचे आश्वासन

972

कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 27  गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या मागणीची जनभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन नगरविकासमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 27  गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या या मागणीच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी संघर्ष समिती आणि युवा मोर्चाच्या पदाधिकाऱयांची मंत्रालयात बैठक बोलावली होती.  या भागाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत असून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे, असे मत त्यांनी या बैठकीत व्यक्त केले.

जनभावना समजून घेण्याकरिता आज बैठक घेतली आहे. 27  गावांतील नागरिकांना महापालिका क्षेत्रातून वगळून स्वतंत्र नगरपालिका हवी आहे, तर काहींना ही गावे महापालिकेत समाविष्ट राहावी असे वाटते. दोन्ही बाजूंना न्याय मिळावा या भूमिकेतून आपण पुढे जाऊया, असे एकनाथ शिंदे म्हणाले.  या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रमोद पाटील, माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, जगन्नाथ शिंदे, माजी आमदार सुभाष भोईर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त गोविंदराज, संतोष केणे, गोपाळ लांडगे, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश म्हात्रे, संघर्ष समितीचे गुलाब वझे आदी उपस्थित होते.  

मी भूमिपुत्रांच्या बाजूने

या भागात विकास झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. मी भूमिपुत्रांच्या बाजूने असून त्यांना मूलभूत सुविधादेखील मिळाल्या पाहिजेत. शासन ग्रामस्थांच्या भूमिकेशी सुसंगत निर्णय घेईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील नागरिकांच्या मागणीचे समर्थन केले आहे. आज संघर्ष समिती आणि युवा मोर्चा तसेच ग्रामस्थांचे म्हणणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करू असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या