
थर्टी फर्स्ट’निमित्त कुटुंबियांसोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांच्या सोईसाठी ‘मेट्रो वन’देखील सज्ज झाली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या या मेट्रो मार्गिकेवर बुधवारी वर्सोवा ते घाटकोपर स्थानकांदरम्यान मेट्रोच्या 28 अतिरिक्त फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे दिवसाच्या एकूण मेट्रो फेऱ्यांची संख्या नियमित 476 वरून 504 होणार आहे.
बुधवारी वर्सोवा आणि घाटकोपर या दोन्ही स्थानकांतून सकाळी 5.30 वाजता पहिली मेट्रो सुटली. संपूर्ण दिवसभर नियमित सेवा देऊन मध्यरात्रीनंतरही ‘मेट्रो-वन’ची प्रवासी सेवा उपलब्ध असणार आहे. 1जानेवारी 2026 रोजी वर्सोवा येथून पहाटे 2.14 वाजता आणि घाटकोपर येथून पहाटे 2.40 वाजता शेवटची ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत धावेल, असे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने जाहीर केले आहे. या अतिरिक्त गाड्यांचा पूर्व उपनगरांतून पश्चिम उपनगरांतील वांद्रे, जुहू, वर्सोवा समुद्रकिनारी फिरण्यास येणाऱ्या मुंबईकरांना फायदा होणार आहे.


























































