
घरफोडीच्या गुन्ह्यात तब्बल 28 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणार्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली. विष्णू विटकर (वय 45, रा. हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याने 1992 साली कोथरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केली होती.
गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी घरफोडीच्या गुन्ह्यात 28 वर्षांपासून फरारी असलेला आरोपी हडपसर गाडीतळ येथे येणार असल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार महेश निंबाळकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून विष्णू विटकरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे, संतोष क्षिरसागर, सुजित पवार, विल्सन डिसोझा, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे, महेश निंबाळकर यांच्या पथकाने केली.


























































