
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
‘टू-जी’ स्पेक्ट्रम घोटाळय़ातील आरोपींविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयाने आज अजब-गजब आदेश जारी केले. या घोटाळय़ाचा एक सूत्रधार असलेल्या शाहीद बलवा याने या प्रकरणातील इतर आरोपींना सोबत घेऊन दक्षिण दिल्ली भागात एकूण 40 हजार झाडे लावावी तसेच पावसाळय़ापर्यंत या झाडांची जातीने निगा राखवी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
‘टू-जी’ स्पेक्ट्रम घोटाळय़ातील दोन आरोपींची तसेच तीन कंपन्यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या आव्हान अर्जाची सुनावणी आज दुपारी न्यायमूर्ती नजमी वजिरी यांच्यासमोर झाली. त्या वेळी शाहीद बलवासह इतरांनी या प्रकरणी उत्तरे देण्यासाठी वेळ मागितला.
या प्रकरणाच्या सुनावणीला अधिक विलंब झालेला आहे. त्यात आरोपींनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याने न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. परंतु उत्तर देण्यासाठी अखेर त्यांना 26 मार्चपर्यंत वेळ वाढवून दिला. आम्ही तुम्हाला शेवटची संधी देत आहोत. मात्र त्यासाठी तुम्हाला दक्षिण दिल्ली परिसरात एकूण 40 हजार झाडे लावावी लागतील, असे बजावले. ही झाडे लावण्यासाठी आरोपींनी संबंधित वनअधिकाऱयांची 15 फेब्रुवारीपर्यंत भेट घ्यावी, असेही न्यायमूर्ती वजिरी यांनी स्वान टेलिकॉम प्रा.लि.चे प्रमोटर शाहीद बलवा, कुसेगाव फ्रुट्स ऍण्ड व्हेजिटेबल्स प्रा.लि.चे संचालक राजीव अग्रवाल यांना बजावले आहे.


























































