कोंढव्यात हुक्क्याची ‘होम डिलीव्हरी’ करणारे त्रिकुट जेरबंद, एक लाखांचा ऐवज जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाउन कालावधीत हुक्क्याची ऑनलाईन ऑर्डर घेउन ‘होम डिलीव्हरी’ करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून सहा हुक्का भांडी, सहा तंबाखूजन्य फ्लेवर पाकीट, चार मोबाईल फोन, दोन दुचाकी असा एक लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई कोंढव्यातील लुल्लानगर परिसरातील धर्मादास लुल्लागार्डन येथे करण्यात आली.

मित विजय ओसवाल (वय 19), रॉयल जयराम मधुरम (वय 28), परमेश महेश ठक्कर (वय 24) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनमुळे शहरातील सर्व आस्थापना बंद आहेत. मात्र, असे असतानाही जादा पैसे कमविण्याच्या हेतूने तिघेजण व्हॉट्स हॉट या वेबसाईटवर हुक्क्याची जाहिरात देऊन घरपोच हुक्का विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने संबंधित वेबसाईटवरील मोबाईल क्रमांकाचे लोकेशन काढले. त्यानुसार त्यांच्याकडे ऑनलाईनरित्या हुक्क्याची मागणी करीत बनावट ग्राहक पाठविला. त्यानंतर पोलिसांनी कोंढव्यातील लुल्लानगर परिसरातील धर्मादास लुल्लागार्डन येथे सापळा रचून मित, रॉयल, परमेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी व्हॉट्स हॉट वेबसाईटवर ऑनलाईन हुक्क्याची ऑर्डर घेउन ‘होम डिलीव्हरी’ करीत असल्याची कबुली दिली.

तिघेही जण काहीही कामधंदा करीत नसून, महाविदयालयीन तरुणांना अंमली पदार्थांची विक्री करण्याचे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, संजय गायकवाड, संदीप साबळे, अमोल पिलाणे, मगर, गुरव, चौधर यांच्या पथकाने केली.