जम्मू-कश्मीर – बारामुल्लामध्ये तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. सुरक्षा दलाच्या गोळीबारामध्ये तीन पाकिस्तान दहशतवादी ठार झाले आहे. दहशतवाद्यांशी लढताना जम्मू-कश्मीर पोलिसातील एका जवानाला वीरमरण आले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बारामुल्ला जिल्ह्यातीर करेरी भागामध्ये बुधवारी काही दहशतवादी दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर एसओजी, लष्कर आणि सीआरपीएफची पथके शोधमोहीम करत होते. शोधमोहिमेदरम्यान नाजीभट भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकांवर अंदाधुंद गोळीबार केला.

प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांकडून हत्यारे, दारुगोळा आणि आपत्तीजनक सामान जप्त करण्यात आल्याची माहिती, आयजीपी विजय कुमार यांनी दिली आहे.

तत्पूर्वी मंगळवारी श्रीनगरच्या अनचार सौरा परिसरात दहशतवाद्यांनी घरात घुसून पोलिसाची गोळय़ा घालून हत्या केली. या गोळीबारात पोलिसाची सात वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली. अनचार सौरा परिसरात पोलीस कर्मचारी सैफुल्ला कादरी यांचे घर आहे.

मंगळवारी सकाळी ते मुलीला घेऊन शाळेत निघाले होते. त्याचवेळी दहशतवादी घरात घुसले आणि अंदाधूंद गोळीबार करून पसार झाले. या गोळीबारात सैफुल्ला यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी सफा गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचार सुरू आहेत.