शहापुरात 3 हजार हेक्टर शेतीचा चिखल; ओल्या दुष्काळाचे सावट, सतत पडणाऱ्या धो धो पावसाने भातपीक पाण्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुलै व ऑगस्ट महिन्यात पडलेल्या समाधानकारक पावसाने भातशेती चांगलीच जोमाने वाढली होती. मात्र आता भातपिके निसावली असतानाच गणपतीपासून कोसळत असलेल्या धुवांधार पावसाने ठिकठिकाणी हाहाकार उडवला आहे. शहापूर तालुक्यात तर सतत पडणाऱ्या धो धो पावसाने भातपीक पाण्यात गेले असून ३ हजार हेक्टर शेतीचा चिखल झाला आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाचे सावट वाढल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी सरकार आतातरी लक्ष देणार का, असा संतप्त सवाल केला आहे.

शहापूर तालुक्यात किमान ३ हजार हेक्टर क्षेत्रात भात, नागली आणि वरई आदी पिकांची लागवड झाली आहे. दरम्यान भातपीक तयार झाले असताना रोज पडणाऱ्या अतिपावसाने हातातोंडाशी आलेला भात वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये पावसाच्या हुल कावणीमुळे भातशेतीला आवश्यक असलेला पाऊस न मिळाल्याने निम्मी पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यावर्षी परिस्थिती उलट असून निम्म्यापेक्षा अधिक भातपिके ही भाताच्या लोब्या बाहेर पडूनही पाण्यात आहेत. शहापूर परिसरात आजपर्यंत ३ हजार ४६० मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली असून मागील वर्षी ती २ हजार १२ मि.मी होती. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी दीपक घरत यांनी केली.

सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.
– बाळा धानके, तालुकाप्रमुख. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)