
जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईचे स्वागत आहे. याप्रमाणेच राज्यातील आणखी 30 सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोलाने विक्री झाली आहे. या गैरव्यवहाराचीही चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
राज्य सहकारी बँकेमार्फत साखर कारखाने संचालकांच्या नातेवाईकांना कवडीमोल किंमतीला विकले गेले. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना दि. 22 ऑगस्ट 2021 रोजी आर्थिक गुन्हे शाखेला पाच दिवसात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार अजित पवार आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल झाला होता. आर्थिक गुन्हे शाखेने राजकीय दबावामुळे अजित पवार, जयंत पाटील अशा नेत्यांचा सहभाग असलेल्या या प्रकरणाबाबत 72,000 पानांचा तपास बंद करण्याचा अहवाल सादर केला आहे. तथापि, आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यापूर्वीच ईडीने दक्षतेने कारवाई केल्यामुळे दखल घेतली गेली आणि जरंडेश्वरच्या जप्तीसारखी कारवाई केली गेली. तशीच कारवाई अन्य कारखान्यांच्या विक्रीत झालेल्या गैरव्यवहाराबाबतही करावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी पत्रात केली आहे.

























































