परतीच्या पावसामुळे 30 लाख हेक्टरवरील खरिप पिके नेस्तनाबूत

989

गेल्या पाच वर्षांपासून कोरड्या दुष्काळाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना परतीच्या धुवाधार पावसाने काळजीच्या खोल दरीत लोटले आहे. परतीच्या पावसाने घातलेल्या धुमशानीमुळे शेतशिवारात अक्षरश: दलदल माजली असून जवळपास 30 लाख हेक्टरवरील खरीप पिके नेस्तनाबूत झाली आहेत.  सोयाबीन, कापसाची या पावसाने माती केली असून बाजरी, मका, ज्वारीची पूर्ण नासाडी केली आहे. खरिपाचा हंगाम हातचा गेला असून लाखो शेतकर्‍यांच्या डोळ्यात भविष्याच्या चिंतेने महापूर दाटला आहे.

दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजला आहे. कधी पावसाची ओढ तर कधी अतिवृष्टी अशा या दुष्टचक्रात या विभागातील शेतकरी फसला आहे. गेल्या पाच वर्षांपासून पावसाने मराठवाड्याकडे पाठच फिरवली होती. यंदाही पावसाळ्यात पावसाने जेमतेम हजेरी लावली. सप्टेंबरमध्ये पावसाळा अधिकृतरित्या संपला आणि त्यानंतर परतीच्या पावसाने धूमशान घालायला सुरूवात केली. दोन महिन्यांपासून पावसाने मराठवाड्यावर संततधार धरली आहे. जेमतेम पावसाच्या भरवशावर आलेल्या खरीप पिकांची या पावसाने अक्षरश: माती केली. सोयाबीन, मका, बाजरीच्या कणसांना जागेवरच धुमारे फुटले. तब्बल 30 लाख हेक्टरवरील खरीप पिकांचा चिखल झाला. साडेबारा लाख हेक्टरवरील सोयाबीन तर 11 लाख हेक्टरवरील कापूस सडला आहे. सोंगणी झालेल्या मका, बाजरीच्या कणसांना कोंभ फुटले आहेत. मराठवाड्यातील साडेआठ हजार गावांतील 30 लाख शेतकर्‍यांवर या पावसाने उपासमारीने संकट ओढवले आहे.

परतीच्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झाले असून त्यापाठोपाठ संभाजीनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात पावसाने धूमशान घातले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाचा थेंबही पडला नव्हता. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली होती. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यातच झाल्या होत्या.

बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

अगोदरच मंदीमुळे बाजारपेठेवर मरणकळा आली आहे. दिवाळीत तरी बाजाराला झळाळी येईल अशी अपेक्षा होती. परंतु परतीच्या पावसाने बाजारच उठवला. दिवाळीत मागणी असूनही पावसामुळे बाजारपेठा ओस पडल्या होत्या. केवळ एकच दिवस पावसाने उघडीप दिल्याने ग्राहकी झाली. उद्योग क्षेत्रावर मंदीची अवकळा असल्याने अनेक उद्योगांनी कामगारांना बोनस दिला नाही. पगारही ऐनवेळेवर झाला, त्याचाही जबर फटका बाजारपेठेला बसला.

नऊ महिन्यात 646 शेतकरी आत्महत्या

अगोदर कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ यामध्ये शेतकरी भरडून निघाला आहे. यावर्षी जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत म्हणजे नऊ महिन्यात 646 शेतकर्‍यांनी दुष्काळाला कंटाळून जीवन संपवले. यात सर्वाधिक 144 आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यापाठोपाठ धाराशिवमध्ये 96 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. संभाजीनगरात 93, जालना 73, परभणी 58, हिंगोली 26, नांदेड 86, लातूर 70 अशी शेतकरी आत्महत्यांची संख्या आहे.

मराठवाड्यात 90 टक्के नुकसान

परतीच्या पावसाने मराठवाड्यात खरीप पिकांचे  90 टक्के नुकसान झाले आहे, कापूस, मका, सोयाबीन हातचे गेल्यातच जमा असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यानुसार  यंत्रणा कामाला लागली आहे, असेही केंद्रेकर म्हणाले.

व्यापारी वर्गालाही फटका

परतीच्या पावसाने मराठवाड्यात हाहाकार माजवला असून शेतकर्‍यांच्या प्रचंड नुकसान झाले आहे. याचा शेतकर्‍यांबरोबरच याचा व्यापारी वर्गालाही मोठा फटका बसला आहे. शेतकर्‍यांकडून व्यापार्‍यांकडे येणारा पैसा थांबल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले. अतिवृष्टीने हानी झालेल्या शेतकर्‍यांना राज्य शासनाने तात्काळ सरसगट मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या