आता चाकरमान्यांसाठी 10 दिवस क्वॉरंटाईन; एसटीच्या 3 हजार बसेस कोकणात सोडणार

1274

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 10 दिवस होम क्वॉरंटाइन व्हावे लागणार आहे. 12 ऑगस्टपूर्वी कोकणात जाणाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल. तर त्यानंतर कोकणात जाणाऱ्यांना स्वॅब चाचणी बंधनकारक असेल. राज्य सरकारने याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी मंगळवारी संध्याकाळपासून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. एसटीने चाकरमान्यांसाठी 3 हजार गाड्या सज्ज ठेवल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

खासगी वाहनांनी कोकणात जाणाऱ्यांना ई-पास काढावा लागेल. एसटीने जाणाऱ्यांना ई-पासची गरज भासणार नाही. एसटी हाच त्या प्रवाशांसाठी ई-पास असेल, अशी माहिती परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. 22 जणांनी मिळून एसटीचे ग्रुप बुकिंग केल्यास प्रवाशांना एसटी थेट त्यांच्या गावात सोडेल. त्यांना जेवण एसटीमध्येच करावे लागेल, अशी माहिती पाटील यांनी दिली. प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच एका एसटी बसमधून 22 जणच प्रवास करू शकणार आहेत. खासगी बसेससाठीही सोशल डिस्टन्सिंगचा नियम लागू आहे. त्यामुळे अनेक खासगी बस वाहतूकदार अव्वाच्या सव्वा दराने तिकीट विक्री करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासगी बसेस एसटीपेक्षा दीडपटच अधिक भाडे आकारू शकतात, अशी सूचना सरकारने केली आहे. यापेक्षा जास्त दर आकारल्यास संबंधित बस वाहतूकदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या