अमरावतीत कोरोनाचा प्रकोप; 305 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून एका दिवसात 305 नवे रुग्ण आढळले असून 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. रॅपिड अँटीजन टेस्टच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच 305 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मंगळवारी दुपारपर्यंत आलेल्या अहवालात 21 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7 हजार 331 झाली आहे. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात एकाच वेळी 125 नवे रुग्ण आढळून आले. तर सायंकाळपर्यंत 180 रुग्ण आढळले होते.

जिल्ह्यात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात चांदूर रेल्वे येथील 39 वर्षीय पुरुष, छाबडा प्लॉट येथील 62 वर्षीय पुरुष, बडनेरा येथील 65 वर्षीय महिला, मांगरुळी पेठ येथील 60 वर्षीय पुरुष व गौतम नगर येथील 15 वर्षीय बालिकेचा समावेश आहे. मंगळवारी दुपारी आलेल्या अहवालात 21 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी बहुतेक रुग्ण शहरातील वेगवेगळ्या भागातील आहेत. तसेच नांदगाव पेठ, धारणी, वरुड, येथील रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात याआधी दररोज 200 च्या आसपास नवे कोरोनाबाधित आढळत होते. मात्र, मंगळवारी या संख्येने उच्चांक गाठला आहे. एका दिवसात तब्ब्ल 305 नवे रुग्ण आढळले आहेत.