हुश्श… देव पावला रे बाबा! कोरोनाबाधित प्रवाशांच्या संपर्कात आलेले 314 जण निगेटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशातून आल्यानंतर कोरोनाबाधित ठरलेल्या मुंबईतील एकूण 29 जणांच्या संपर्कात आलेल्या सर्व 314 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमधील दोन जणांना ओमायक्रोनची लागण झाल्याचे अहवाल 6 डिसेंबर रोजी आले असताना निकट संपर्कातील एकालाही कोरोनाचीही लागण झाली नसल्याचे समोर आल्याने मुंबईला तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईतही कोरोना व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने पालिका सतर्क झाली असून गेल्या महिनाभरापासून ओमायक्रोन प्रभावित ‘रिस्क कंट्रीज’मधून मुंबईत आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. यामध्ये आतापर्यंत 1 नोव्हेंबरपासून 6 डिसेंबरपर्यंत सुमारे 5510 प्रवासी ‘रिस्क  कंट्रीज’मधून मुंबईत आले आहेत. यांच्या चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित आढळणाऱयांची पुण्याच्या  नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये जिनोम सिक्वेंसिंग चाचणीही करण्यात येत आहे. यामध्ये कोरोनाबाधित 20 प्रवासी आणि त्यांच्या संपर्कातील 9 अशा सर्व 29 जणांची जिनोम सिक्वेसिंग चाचणी करण्यात येत आहे.

बाधित प्रवाशांसाठी ‘सेव्हन हिल्स’मध्ये 250 बेड

  • पालिकेच्या शोधमोहिमेत कोरोनाबाधित आढळणाऱया आणि ओमायक्रोनबाधित आढळणाऱया रुग्णांसाठी पालिकेच्या अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात 250 बेड तैनात ठेवण्यात आले आहेत.
  • याशिवाय ताडदेवचे ब्रीच पॅण्डी आणि मुंबई रुग्णालयातही प्रत्येकी दहा बेड तयार ठेवण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. दरम्यान, ओमायक्रोनबाधित आढळलेल्या दोन्ही बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे नसून त्यांची प्रकृतीही उत्तम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ओमायक्रोनवर मात केली, कोरोनाने ग्रासले; बंगळुरूचा डॉक्टर आयसोलेट

ओमायक्रोन हा कोरोनापेक्षा सौम्य असला तरी त्याचा हल्ला करण्याचा वेग अनेक पट आहे. बंगळुरूमधील एका 46 वर्षीय डॉक्टरला ओमायक्रोनची लागण झाली होती. त्यांनी ओमायक्रोनवर मात केली. त्यानंतर त्यांनी एका आंतरराष्ट्रीय परिषदेलाही हजेरी लावली. मात्र त्यानंतरही त्यांना ताप व डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना चाचणी केली गेली. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती बंगळुरू महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. या डॉक्टरला विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. देशात सापडलेल्या ओमायक्रोनच्या पहिल्या दोन रुग्णांमध्ये या डॉक्टरचा समावेश होता.

एकही प्रवासी ‘मिसिंग’ नाही!

ओमायक्रोन प्रभावित देशातून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांची पालिकेचा संपर्क होत असून एकही प्रवासी मीसिंग नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. होम क्वारंटाइन असलेल्यांना पालिकेच्या 24 वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून दिवसाला पाच वेळा संपर्क करून नजर ठेवण्यात आल्याचेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.